महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला असून त्याच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे, असे सांगून भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीच्या आक्रमक वृत्तीचे समर्थन केले आहे. ‘‘कोहलीच्या आक्रमकपणाबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. याच आक्रमक वृत्तीमुळे कोहलीकडून सर्वोत्तम कामगिरी होत आहे. मात्र या आक्रमकपणाचा फायदा त्याने भविष्यातील युवा खेळाडूंच्या संघबांधणीसाठी करायला हवा,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.
‘‘कोहलीने आक्रमक खेळी साकारत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तीन शतकी खेळी साकारल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञमंडळींसह तेथील जनताही कोहलीच्या या कामगिरीवर फिदा आहे. कारण ऑस्ट्रेलियन भूमीत बऱ्याच वर्षांनी कांगारूंच्या वेगवान माऱ्यासमोर अशा प्रकारची कामगिरी एखाद्या खेळाडूने केली आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनीही कोहलीच्या आक्रमक वृत्तीची प्रशंसा केली आहे. कोहली हा युवा खेळाडू आणि आता युवा कर्णधार आहे. अनुभवातून तो बरेच काही शिकत जाईल. पण कर्णधार म्हणून स्थिरावण्यासाठी त्याला वेळ द्यायला हवा,’’ असे शास्त्री यांना एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
कोहली आणि शास्त्री यांच्यातील जवळीक धोनीच्या निवृत्तीसाठी कारणीभूत ठरली, या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले, ‘‘धोनीने निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वानाच चकित केले. सामना संपल्यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये आला आणि मी कसोटीतून निवृत्त होत आहे, असे सांगून सर्वानाच धक्का दिला. त्याने हा निर्णय कुटुंबीयांना न कळवता प्रथम सहकाऱ्यांना सांगितला. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना धोनीने विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. युवा खेळाडूकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याची वेळ आली आहे, असे त्याला वाटले असावे. धोनीने योग्य वेळी हा निर्णय घेतला, असे मला वाटते.’’
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीविषयी ते म्हणाले, ‘‘भारतीय संघ या मालिकेत ०-२ असा पिछाडीवर असला तरी खुद्द ऑस्ट्रेलियातील जनतेने भारताच्या कामगिरीची स्तुती केली आहे. भारतीय संघाने सुरेख आक्रमक खेळ करत छाप पाडली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करून परदेशातही आम्ही कसोटी सामने जिंकू शकतो, हा सकारात्मक दृष्टिकोन भारतीय संघाचा तयार झाला आहे. सलामीवीर मुरली विजयची कामगिरी असो वा अजिंक्य रहाणे आणि कोहली यांच्यातील भागीदारी, यावरून हे युवा खेळाडू पुढील पाच-सहा वर्षे एकत्र खेळू शकतात, हे सिद्ध झाले आहे. या पाच-सहा वर्षांत भारताचा एक चांगला संघ तयार होईल. मी संचालकपदी आल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरण आनंदी बनले आहे.’’

Story img Loader