इंडियन प्रीमिअर लीगमध्ये नव्याने दाखल झालेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. फॉर्मात असलेला सनरायजर्सचा फलंदाज शिखर धवन दुखापतीमुळे पुणे वॉरियर्सविरुद्ध होणाऱ्या सलामीच्या सामन्यात खेळणार नाही.
‘‘शिखर धवनने ५ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे. धवनच्या दुखापतीविषयी आम्ही बीसीसीआय आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहिती घेत आहोत. लवकरच तो सनरायजर्स संघात सामील होईल अशी आशा आहे,’’ असे हैदराबाद संघाचे प्रशिक्षक टॉम मुडी यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणाच्या सामन्यात धवनने सर्वाधिक जलद शतकाची नोंद केली होती. तिसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करत असताना झालेल्या दुखापतीमुळे तो चौथ्या सामन्याला मुकला होता. धवन किती सामन्यांना मुकणार, असे विचारले असता मुडी म्हणाले, ‘‘त्याच्या दुखापतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. पण तो किती सामन्यांत खेळू शकणार नाही, हे आताच सांगता येणार नाही.’’

Story img Loader