देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती अजुनही आटोक्यात येत नाहीये. अजुनही महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. मात्र या दरम्यान परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे अखेरीस बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सध्या भारतीय संघाचे खेळाडू आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत.
भारतीय संघाचा सलामीवीर आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं प्रतिनिधीत्व करणारा शिखर धवनही सध्या घरातच आहे. पण आयपीएल स्थगित झाल्यामुळे शिखरने घरातल्या घरात आपल्या मुलासोबत क्रिकेट खेळण्याचा पर्याय निवडला आहे. आपला मुलगा झोरावरसोबत क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ शिखर धवनने आपल्या सोशल इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
लॉकडाउन काळात शिखर धवन सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झालेला आहे. आपल्या मुलांसोबत पिलो फाईट, घरातली सर्व कामं करणं, बायको आणि मुलांसोबत फिल्मी गाण्यावर डान्स असे विविध व्हिडीओ शिखर आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. दरम्यान करोना विषाणूवर अद्याप कोणतही ठोस औषध सापडलेलं नसल्यामुळे क्रीडा स्पर्धा कधी सुरु होतील याची शाश्वती देता येणार नाहीये. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही आगामी काळात भारतात क्रिकेट खेळवलं जाणार नाही हे स्पष्ट केलंय.