फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये अर्जेंटिनाने ३६ वर्षानंतर जेतेपद जिंकलं. फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीला या विजयासहीत अर्जेंटिनाच्या संघाने ड्रीम सॅण्डऑफ दिला. मेसीने विश्वचषक जिंकल्यानंतर आठवड्याभरानंतर भारताचा माजी फलंदाज आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मुलीसाठी एक खास भेट पाठवली आहे. धोनीची मुलगी झिवा हिच्यासाठी मेसीने एक अशी भेट पाठवली आहे की ज्यासाठी त्याचे चाहते अगदी जीवाची बाजी लावायला ही तयार असतात.
काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटूने प्रग्यान ओझाने केलेल्या पोस्टमध्ये मेसीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जय शाह यांच्यासाठी ऑटोग्राफ केलेली एक खास जर्सी पाठवल्याचं म्हटलं होतं. आता अशाच प्रकारची जर्सी मेसीने धोनीच्या मुलीसाठी म्हणजे जीवासाठी पाठवली आहे. जीवाच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन या जर्सीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मेसीने पाठवलेली जर्सी दिसत असून त्याचा ऑटोग्राफ म्हणजेच स्वाक्षरीही दिसत आहे.
वडिलांप्रमाणेच मुलीलाही आवडणारी गोष्ट अशा अर्थाची कॅप्शन देत हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या जर्सीवर झिवासाठी दोन शब्दांचा मेसेज लिहिण्यात आला आहे. ‘पारा झिवा’ असा हा संदेश आहे. अर्जेंटिनामध्ये वापरल्या जाणाऱ्या स्पॅनिश भाषेनुसार ‘पारा’ शब्दाचा अर्थ फॉर म्हणजेच साठी असा होतो. म्हणजेच ही जर्सी झिवासाठी आहे असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण : मेसीने World Cup ची ट्रॉफी उचलताना अंगावर काळा पारदर्शक ‘कोट’ का घातला होता? त्यावरुन का सुरु झालाय वाद?

भारतामध्ये मेसीचे कोट्यावधी चाहते आहेत. एमएस धोनीसुद्धा फुटबॉलचा चाहता आहे. काही वर्षांपूर्वी धोनीने मेसीसंदर्भात एक ट्वीटही केलं होतं. सध्या धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसला तरी त्याच्या मुलीच्या नावाने सुरु असलेल्या अकाऊंटवरुन पोस्ट केलेला जर्सीचा फोटो मात्र चर्चेत आहे.