१९८३मध्ये भारताला आश्चर्यकारकरीत्या विश्वचषकजिंकून देण्याची किमया साधली ती कपिलदेवने. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या क्रिकेटच्या साऱ्याच प्रांतांवर त्याने आपल्या अभिजात गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. परंतु आपला सर्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघ जाहीर करताना त्याने स्वत:ची मात्र जाणीवपूर्वक निवड केली नाही. २००७मध्ये ट्वेन्टी-२० आणि २०११मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारताला जिंकून देणारा संघनायक महेंद्रसिंग धोनीकडे कपिलने या संघाचे नेतृत्व बहाल केले आहे.
अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्याकडे कपिलने भारताच्या फिरकीची धुरा सोपवली आहे, तर सौराष्ट्रचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला संघात १२ वा खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.
भारताचा महान खेळाडू, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर फलंदाजीची मदार असेल, तर जवागल श्रीनाथ आणि झहीर खान वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील. १९८३मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम दाखविणाऱ्या भारतीय संघातील एकाही खेळाडूला कपिलने या संघात स्थान न दिल्याबद्दल आश्चर्य प्रकट केले जात आहे. याविषयी कपिल म्हणाला की, ‘‘हा भारताचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ आहे, असे मला वाटते. क्रिकेटरसिकांना कदाचीत ते पटणार नाही. परंतु हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. याचप्रमाणे जर मी हा संघ निवडत असेन, तर मी स्वत:ला कसे काय संघात स्थान देऊ शकेन.’’
इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक जिंकून दाखवणारा धोनीच्या नेतृत्वाखालील संघ हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम संघ असल्याचे कपिलने यावेळी नमूद केले. ‘‘त्या संघात सेहवाग, गौतम गंभीर, झहीर नव्हते. परंतु ज्या पद्धतीने संघ खेळला, ते पाहता या कुणाचीही उणीव भासली नाही. वेस्ट इंडिज संघाला आतासुद्धा विवियन रिचर्ड्स, डेसमंड हेन्स यांची पोकळी जाणवते,’’ असे कपिलने सांगितले.
‘‘इतक्या चमकदारपणे क्षेत्ररक्षण करणारा संघ मी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कदापि पाहिला नव्हता. चॅम्पियन्स करंडक जेतेपदाचे ते निर्विवाद हक्कदार होते,’’ असे तो म्हणाला.
कपिलचा सर्वकालीन सर्वोत्तम संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग, विराट कोहली, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ, झहीर खान, १२वा खेळाडू – रवींद्र जडेजा.

Story img Loader