‘‘इंग्लंडकडून आमच्या घरच्या मैदानावर आम्हाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. या पाश्र्वभूमीवर कांगारूंविरुद्धच्या विजयाने पुन्हा आमची शान वाढविली आहे. शेवटपर्यंत चांगली लढत दिली तर यश आपोआपच मिळत राहते, हे या मालिकेत दिसून आले आहे. संघात अनेक बदल करण्यात आले असूनही आम्ही नवोदित खेळाडूंसह सर्वोत्तम कामगिरी करू शकलो, याचेच मला अधिक समाधान वाटत आहे,’’ या भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मालिका विजयाच्या वाक्यांमध्येच ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या निर्विवाद ४-० या ऐतिहासिक विजयाचे सार सामावलेले आहे. इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव झाल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे स्वत:च्याच मैदानात पानीपत होणार का, हा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला होता. पण गुणवत्तेवर विश्वास असेल तर यश मिळतेच, हेच या मालिकेतून दिसून आले. गुणवत्तेबरोबर हा विजय धोनीच्या मानसिकतेचा आणि ‘माइंड गेम’चा आहे. कारण इंग्लंडच्या पराभवानंतर झालेल्या इभ्रतीच्या राखेतून त्यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली. संघाला हा विजय मिळालेला आहे तो युवा खेळाडूंच्या जोरावर. या मालिकेतील सर्वाधिक धावा आणि विकेट्सच्या यादीवर नजर टाकली तर भारतीय यंगिस्तानने केलेल्या कमाल कामगिरीच्या जोरावर इतिहास रचला गेला आहे. संघातील काही बदल या वेळी पथ्यावर पडले आणि युवा खेळाडूंनी त्याचा पुरेपूर फायदा उचलत या संधीचे सोने करून दाखवले.
गेले बरेच महिने फक्त राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसून राहणाऱ्या मुरली विजयने संधी मिळताच त्याचे सोने करून दाखवले. त्याच्याकडे असलेली शैली आणि फलंदाजी कौशल्याचे दर्शन या वेळी पाहायला मिळाले. ४ सामन्यांमध्ये २ शतके आणि एका अर्धशतकाच्या जोरावर त्याने ४३० धावांचा डोंगर उभारला. पण एकदाही त्याला सामनावीराचा किताब मिळू शकला नाही, याचे वाईट वाटते. शिखर धवनने मिळालेल्या संधीत १८७ धावांची अफलातून खेळी साकारत निवडीवरील विश्वास सार्थ ठरवला. चेतेश्वर पुजारा हा सध्यातरी भारतीय संघाची ‘रनमशीन’ ठरताना दिसत आहे. दुसऱ्या सामन्यात द्विशतकीय लाजवाब खेळी साकारत त्याने मालिकेत ४१९ धावांचा डोंगर उभारला. कोटला कसोटीच्या दुसऱ्या डावातील नाबाद ८२ धावांची खेळी त्याच्या फलंदाजीच्या तंत्रातील कौशल्य दाखविणारी होती. धोनीने पहिल्याच सामन्यात झळकावलेले द्विशतक म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची मर्यादा स्पष्ट करणारी ठरली. त्याच्या या २२४ धावांच्या खेळीने सामन्याबरोबरच मालिकेचाही नूर बदलला. सचिन तेंडुलकरला मात्र अजूनही शतकांचा उपवास या मालिकेतही सोडता आला नाही, तर कोहलीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवला. अजिंक्य रहाणेने मिळालेली अनमोल संधी गमावत स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला.
गोलंदाजीमध्ये मालिकावीर ठरलेल्या आर. अश्विनचा बोलबाला पाहायला मिळाला. आपल्या फिरकीच्या तालावर चार सामन्यांमध्ये तब्बल २९ फलंदाजांना बाद करण्याची किमया त्याने साधली. त्याला या वेळी चांगली साथ मिळाली ती डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाची. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कला सहा डावांमध्ये पाच वेळा बाद करत त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या मनोबलाचे खच्चीकरण केले. चार सामन्यांमध्ये दोन डझन बळी मिळवीत त्याने अश्विनला सुरेख साथ दिली. या दोघांनाही आपली गुणवत्ता, कुवत आणि नेमके काय करायचे याची उत्तम जाण होती आणि त्यामुळे या जोडीने मालिकेत तब्बल ५४ बळी मिळवले. भुवनेश्वर कुमारने आपण कसोटी संघातही बसू शकतो, हे दाखवून दिले. इशांत शर्माचा हवा तसा प्रभाव जाणवला नाही, तर हरभजन सिंग आणि प्रग्यान ओझा या दोन्ही फिरकीपटूंना आपली छाप पाडता आली नाही.
ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर त्यांच्या संघाची मानसिकता ही कसोटी सामना खेळण्याची नाहीच, हे प्रकर्षांने जाणवले. दुखापती आणि शिस्तभंग कारवाईचे नाटय़ संघाला फार भारी पडले. डेव्हिड वॉर्नर, एड कोवन आणि फिलीप ह्य़ुजेस या त्रिकुटाला कामगिरीत सातत्य दाखवता आले नाही आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची त्रेधा उडाली. क्लार्क प्रत्येक डावात पहिल्याच चेंडूपासून पुढे येऊन खेळायला लागला आणि त्याने त्याचे इरादे स्पष्ट केले खरे, पण त्याला चांगली साथ मिळाली नाही. उपकर्णधार शेन वॉटसन हे संघाचे ‘ट्रम्प कार्ड’ असले तरी दुखापतीमुळे त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मिचेल स्टार्क, पिडर सिडल या तळाच्या फलंदाजांनी मात्र जे फलंदाजांना जमले नाही अशी उपयुक्त फलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये फिरकीपटू नॅथन लिऑनने काही वेळा फलंदाजांना पेचात टाकले खरे, पण ‘मॅच विनर’ ठरू शकला नाही. जेम्स पॅटीन्सन, पिटर सिडल यांचा मारा हवा तसा टिच्चून झाला नाही.
दोन्ही संघात महत्त्वाचा फरक हा फलंदाजीच्या त्रिकुटामध्ये आहे. भारताचे सलामीवीर आणि चेतेश्वर पुजारा यांनी नवीन चेंडू मधल्या फळीत येऊ दिला नाही आणि त्यामुळेच भारताला जास्त धावा रचत्या आल्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पहिले तिन्ही फलंदाज अपयशी ठरत होते. गोलंदाजीमध्ये अश्विन आणि जडेजा यांनी ऑस्ट्रेलियाला चांगलेच नाचवले तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज प्रभावहीन दिसली. भारताचा हा विजय नक्कीच ऐतिहासिक आहे, पण भारतातल्या विजयांपुढे जाऊन संघाने परदेशातील विजयांचा विचार करायला हवा, तरच भारतीय संघ क्रिकेट विश्वावर राज्य करू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा