भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीच्या इंडिया सिमेंट्स कंपनीचा उपाध्यक्ष तसेच आता रिती स्पोर्ट्स या कंपनीमध्ये १५ टक्के भागीदारी असल्याचे उघड झाल्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा पाय आणखी खोलात रुतण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजा, सुरेश रैना, प्रग्यान ओझा आणि रुद्रप्रताप सिंग या खेळाडूंच्या व्यवस्थापनाचे काम रिती स्पोर्ट्स ही कंपनी पाहते. रिती स्पोर्ट्सचा मालक अरुण पांडे हा धोनीचा जीवलग मित्र आहे. भारतीय कर्णधार आणि कंपनीचा भागीदार म्हणून धोनीने परस्परविरोधी हितसंबंध जपले. तसेच कंपनीच्या फायद्यासाठी या खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्याच्या निर्णयांमध्ये धोनीचे हितसंबंध असल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे.
धोनी या कंपनीशी जोडला गेलेला असल्यामुळे अनेक क्रिकेटपटू रिती स्पोर्ट्सला प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच ही कंपनी सध्या फॉर्मात आहे. धोनीच्या या व्यावहारिक संबंधाचा फायदा या कंपनीशी संलग्न असलेल्या खेळाडूंना मिळत आहे, असा आरोप माजी क्रिकेटपटू मनींदर सिंग यांनी केला आहे.
रिती स्पोर्ट्शी संबंध नाही -रुद्रप्रताप सिंग
रिती स्पोर्ट्स संस्थेशी आपला काहीही संबंध नाही. ही संस्था माझे व्यवस्थापन करीत असल्याचे वृत्त खोडसाळपणाचे आहे, असे वेगवान गोलंदाज रुद्रप्रताप सिंगने सांगितले. रिती स्पोर्ट्स संस्थेत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे १५ टक्के भांडवल आहे. रुद्र प्रताप, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, प्रग्यान ओझा आदी खेळाडूंचे व्यवस्थापन रिती स्पोर्ट्सकडे असल्याचे वृत्त येथील एका दैनिकात प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगून रुद्रप्रताप म्हणाला, ‘‘हे वृत्त देण्यामागचा हेतू मला कळला नाही. मात्र या संस्थेशी माझा काहीही संबंध नाही.’’
रिती स्पोर्ट्स कंपनीत धोनीचे भाग भांडवल नाही -पांडे
विविध खेळाडूंच्या प्रायोजकत्वाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या रिती स्पोर्ट्स कंपनीत महेंद्रसिंग धोनी याचे भाग भांडवल असल्याचा आरोप कंपनीचे मालक अरुण पांडे यांनी फेटाळून लावला आहे. या कंपनीत धोनीचे १५ टक्के भांडवल असल्याचे सोमवारी प्रकाशात आले होते. त्याचा इन्कार करीत पांडे म्हणाले, ‘‘धोनी हा माझा मित्र निश्चित आहे याचा अर्थ त्याने माझ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे असा होत नाही. धोनी याला पैसे देण्याऐवजी सुरुवातीस कंपनीचे समभाग देण्यात आले होते मात्र त्याला देय असलेली सर्व रक्कम एप्रिल २०१३ पूर्वीच अदा करण्यात आली आहे.’’