Ravichandran Ashwin Praises Rohit Sharma: संपूर्ण विश्वचषकात १० सामने जिंकूनही अंतिम टप्यात भारताला बहुप्रतीक्षित विश्वविजेतेपद जिंकता आले नाही. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव २४० धावांमध्ये गुंडाळला होता. तर संध्याकाळच्या वेळी फलंदाजी करताना अवघ्या ४२ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य पूर्ण केले. सहाव्यांदा विश्वचषक जिंकलेल्या संघाने भारतीय मैदानांचा पुरेपूर अभ्यास केला होता तसेच आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव सुद्धा या स्पर्धेत खूप कामी आला असेही त्यांच्या खेळात दिसत होते.
ऑस्ट्रेलियाच्या प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णयावर यापूर्वी अश्विनने ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांच्याशी चर्चा केल्याबाबत सुद्धा आपल्या युट्युब व्हिडिओमध्ये खुलासा केला होता. सगळं काही जुळून आल्याने ऑस्ट्रेलियाला मिळालेला विजय भारतीय क्रिकेट प्रेमींच्या व खेळाडूंच्या सुद्धा जिव्हारी लागला होता, या विश्वचषकात संघातील वातावरण कसे होते यावर अश्विनने अलीकडेच एका मुलाखतीत भाष्य केले आहे.
धोनी सर्वोत्कृष्ट कर्णधार पण रोहित..
एस बद्रीनाथ यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विनने अंतिम पराभवानंतरच्या काही दुःखद क्षणांविषयी भाष्य केले. तत्पूर्वी त्याने कोहली व रोहित शर्मा दोघांचेही तोंडभरून कौतुक केले. रोहित शर्माच्या कर्णधार म्हणून संघातील भूमिकेवर अश्विन म्हणाला की, “तुम्ही भारतीय क्रिकेटकडे पाहिल्यास, प्रत्येकजण तुम्हाला सांगेल की एमएस धोनी हा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. तसाच रोहित शर्मा एक उत्कृष्ट व्यक्ती आहे. तो संघातील प्रत्येक व्यक्तीला समजून घेतो, प्रत्येकाला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे त्याला माहीत आहे. तो समजूतदार आहे आणि प्रत्येकाला ओळखण्याचा प्रयत्न करतो. त्याची मेहनतही प्रचंड आहे. त्याने किती वेळा झोपेवर पाणी सोडलंय, तो प्रत्येक मीटिंगचा भाग असतो, प्रत्येकाला संघाने ठरवलेले डावपेच समजावून सांगतो.”
हे ही वाचा<< “रोहित शर्मा, कोहली रडत होते आणि तेव्हा..”, अश्विनने सांगितलं, विश्वचषक गमावल्यावर संघामध्ये काय घडलं?
दुसरीकडे विराट कोहलीची रोहितला चांगली साथ लाभत असल्याचे अश्विनने नमूद केले. या दोन्ही खेळाडूंनी संघातील प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं होतं एक माहोल तयार केला होता. भारतीय क्रिकेटमध्ये असं नेतृत्व तयार होणे ही मोठी प्रगती आहे.”, असेही अश्विन म्हणाला.