ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. टी-२० सामन्यांची मालिका ०-२ ने गमावल्यानंतर भारताने ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघाने दमदार पुनरागमन करत २-३ ने बाजी मारत भारताला पराभवाचा धक्का दिला होता. या मालिकेत अखेरच्या दोन सामन्यात भारताने महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देऊन ऋषभ पंतला संघात जागा दिली.
अवश्य वाचा – विराट कोहली कर्णधार म्हणून धोनीवर अवलंबून – अनिल कुंबळे
विश्वचषकाच्या तोंडावर आलेल्या या संधीचं सोनं करणं ऋषभला जमलं नाही. अखेरच्या दोन्ही वन-डे सामन्यात ऋषभने ढिसाळ यष्टीरक्षण करत, कर्णधार कोहलीसह चाहत्यांचा रोषही ओढावून घेतला. मोहालीच्या मैदानाच प्रेक्षकांनी धोनी…धोनी असा गजर करत पंतला ट्रोल केलं. मात्र धोनी हा एक दिग्गज खेळाडू आहे, त्याची आणि माझी तुलना करु नका असं मत ऋषभने व्यक्त केलं आहे. एका खासगी कार्यक्रमात तो एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होता.
“घडून गेलेल्या गोष्टींचा आणि होणाऱ्या टिकेचा मी फारसा विचार करत नाही. एक खेळाडू म्हणून मी धोनीकडून प्रत्येक वेळी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. तो एक दिग्गज खेळाडू आहे, लोकांनी त्याची आणि माझी तुलना करणं थांबवावं. माझा मैदानातला खेळ कसा असावा यासाठी मी प्रत्येक वेळी धोनीकडून सल्ला घेत असतो.” ऋषभने आपली बाजू स्पष्ट केली.
आगामी विश्वचषकासाठी संघात पर्यायी यष्टीरक्षक म्हणून ऋषभच्या नावाचा विचार होत होता. मात्र अखेरच्या दोन सामन्यातील कामगिरी पाहता ऋषभची भारतीय संघात निवड होईल की नाही याबाबत शंका आहे. आयपीएलमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. त्यामुळे या हंगामात ऋषभच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.