श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली. नुकतच भारताच्या वन-डे संघाची घोषणा करण्यात आली. ज्यात भारताच्या सिनीअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघात यष्टीरक्षक म्हणून जागा मिळाली आहे. युवराज सिंहला निवड समितीने विश्रांती देण्याचा निर्णय जरी घेतला असला तरीही धोनीला संघात आणखी एक संधी मिळाली आहे. मात्र आगामी विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून धोनीसमोरचा रस्ता हा सोपा नसणार आहे, आपलं स्थान संघात टिकवून ठेवण्यासाठी त्यालाही आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवावं लागणार आहे. खुद्द निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांनीच असे संकेत दिले आहेत.

वन-डे संघाची घोषणा केल्यानंतर प्रसाद यांनी श्रीलंकेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी धोनीबद्दल अंतिम निर्णय घेण्याआधी तो आगामी सामन्यांमध्ये कसा खेळतो हे आम्हाला पहायचं आहे, यानंतर विश्वचषकात कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेतला जाईल, असं प्रसाद म्हणाले आहेत. “धोनी हा आमच्यासमोरचा एकमेव पर्याय नाही. ऋषभ पंतच्या कामगिरीवरही आमचं लक्ष आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र तरीही आगामी टी-२० सामन्यांमध्ये त्याला संधी देण्याचा आमचा विचार आहे. हार्दीक पांड्या प्रमाणे आम्ही पंतला अधिकाधिक संधी देण्याच्या विचारात आहेत”, असं प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितलं.

गेल्या काही सामन्यांमध्ये धोनीची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी नव्हती. चॅम्पियन्स करंडकातही त्याने हवीतशी खेळी केली नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला सूर सापडला, मात्र त्याच्या संथ खेळीमुळे भारताला चौथी वन-डे गमवावी लागल्याचा आरोप नेटीझन्स आणि क्रीडा समीक्षकांनी केला होता. यानंतर राहुल द्रविड सारख्या खेळाडूंनीही आगामी विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन युवराज आणि धोनीच्या संघातील सहभागाबद्दल निर्णय घेण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं.

अवश्य वाचा – श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी संघ जाहीर, पालघरच्या शार्दुल ठाकूरचा संघात समावेश

त्यामुळे निवड समिती प्रमुखांनी केलेल्या वक्तव्यामुळे आगामी श्रीलंका दौऱ्यात महेंद्रसिंह धोनी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – ‘या’ कारणांमुळेच धोनी सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरतो

Story img Loader