महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सलग 3 सामन्यांमध्ये 3 अर्धशतक झळकावत धोनीने मालिकावीराचा किताबही पटकावला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेलं 231 धावांचं आव्हान धोनीने केदार जाधवसोबत शतकी भागीदारी रचत पूर्ण केलं. मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स धोनीच्या खेळाबद्दल फारसे आश्वस्त नाहीये. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रासाठी लिहीलेल्या सदरात जोन्स यांनी, धोनी भारतीय फलंदाजीतली मुख्य समस्या असल्याचं म्हटलं आहे.
अवश्य वाचा – धोनीला एकटं सोडलं नाहीस हे चांगलं केलंस, सौरव गांगुलीकडून विराटचं कौतुक
“धोनी हा भारतीय फलंदाजीची मुख्य समस्या आहे. जर भारत धोनी आणि ऋषभ पंत या दोन्ही खेळाडूंना अंतिम संघात जागा देणार असेल तर धोनीला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळतोय, ते पाहता विश्वचषक त्यांच्यासाठी अनुकूल जाईल. याचसोबत न्यूझीलंड दौऱ्यातही विजयी होणं भारतीय संघासाठी गरजेचं आहे. मात्र न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची रणनिती फसली आणि भारताला पराभव पत्करावा लागला तर सर्व गोष्टी बिघडू शकतात.” डीन जोन्स यांनी आपलं मत व्यक्त केलं.
अवश्य वाचा – विराट कोहली ठरला ‘हॅटट्रीक हिरो’, पटकावले ICC चे मानाचे पुरस्कार
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धोनीने 3 अर्धशतक झळकावली खरी, पण त्याच्या संथ खेळीवर अनेकांनी टीका केली. अंतिम फेरीत धोनीने 87 धावा झळकावल्या परंतु 231 धावांचं आव्हान असल्यामुळे भारताला धोनीने वाया घालवलेल्या चेंडूचा फटका बसला नाही. याच जागी भारतासमोर मोठं आव्हान असतं तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता. बुधवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होते आहे, या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – वन-डे क्रिकेटमध्ये अजुनही धोनीच सर्वोत्तम फिनीशर !