इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी फिरकी गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ा पाहिजेत, अशी मागणी करणारा भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर भारताचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी जोरदार टीका केली आहे. धोनीने केलेली मागणी अयोग्य आहे. माझ्या कारकीर्दीत कोणत्याही कर्णधाराने अशा प्रकारची मागणी कधीही केली नव्हती, असे कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितले.
‘‘आमच्या वेळी फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांची मागणी करणारे जाहीर वक्तव्य कुणीही केले नव्हते. त्यामुळे धोनीची ही मागणी चुकीची आहे. खेळपट्टीचे स्वरूप कसे असेल आणि खेळपट्टीकडून कोणत्या अपेक्षा आहेत, इतकेच आम्ही क्युरेटरला विचारत असू. पण अशाचप्रकारची खेळपट्टी बनली पाहिजे, असा आदेश आम्ही कधीही क्युरेटरला दिला नाही,’’ असे इंग्लंडविरुद्ध सर्व सामने जिंकून देणारा कर्णधार अशी ओळख असलेल्या कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितले.
भारताला मायदेशातील खेळपट्टय़ांवर खेळण्याचा फायदा होईल, हे स्वाभाविक असले तरी जाहीरपणे अशी मागणी करण्यात कोणताच अर्थ नसल्याचे कॉन्ट्रॅक्टर यांना वाटते. ते म्हणतात, ‘‘सततच्या पराभवांमुळे भारतीय संघाच्या चाहत्यांमध्ये घट होत असली तरी धोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवायलाच हवा. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांना स्थिरावण्याची संधी द्यायला हवी.’’
सचिन तेंडुलकरच्या भवितव्याबाबत बोलण्यास मात्र कॉन्ट्रॅक्टर यांनी नकार दिला. ‘‘ज्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावली आहेत. त्याच्या भवितव्याबाबत मला न विचाराल तर बरे होईल,’’ असे कॉन्ट्रॅक्टर म्हणाले. कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर यांचा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालतर्फे सत्कार केला जाणार आहे. क्रिकेटमधील भारताच्या सुवर्णयुगाच्या आठवणींना उजाळा देत कॉन्ट्रॅक्टर म्हणाले, ‘‘ईडन गार्डन्सपासूनच क्रिकेटमधील भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख उंचावत गेला. त्यावेळी भारतीय संघात मन्सूर अली खान पतौडी, एम. एल. जयसिम्हा, दिलीप सरदेसाई, फारूख इंजिनियर आणि अनेक दिग्गज खेळाडू होते. क्रिकेटमधील भारताच्या सुवर्णयुगाची ती सुरुवात होती. ’    

Story img Loader