मायदेशातील मालिकांमध्ये इंग्लंडपाठोपाठ पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यात भारताला अपयश आल्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर कडाडून टीका होऊ लागली आहे. प्रत्येक पराभवानंतर भारतीय संघावर होणाऱ्या टीकेत वाढ होऊ लागली आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी ‘धोनीला हटवा, कोहलीकडे कर्णधारपद सोपवा,’ अशी जाहीर मागणी करण्यास सुरुवात केली आहे.
‘‘धोनी हा ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील चांगला कर्णधार असला तरी आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत धोनीकडे कर्णधारपद देता कामा नये. धोनीची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी वाईट असून त्याने मायदेशात मालिका गमावण्याची करामत केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करणाऱ्या धोनीची वेळ आता भरली असून तो शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा दमलेला आहे. त्याची फलंदाजी चांगली होत असली तरी त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात यावे आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूकडे भारताच्या नेतृत्वाची धुरा सोपवायला हवी,’’ असे जाहीर मत निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, ‘‘आश्चर्यकारक निर्णय घेणे, ही भारतीय क्रिकेटमधील मोठी समस्या आहे. संघात घाऊक बदल करण्यासाठी आपण नेहमीच घाबरत असतो. पण आता नेतृत्वापासून ते सगळ्या बाबतीत बदल आवश्यक आहेत. सर्वप्रथम नेतृत्वाबाबत निर्णय घ्यायला हवा. जुनी विचारसरणी मागे टाकून आता नवनवीन कल्पना राबवण्याची गरज आहे. मैदानावर भरीव कामगिरी करता येईल, अशा बदलांची आता अपेक्षा आहे.’’
याविषयी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस म्हणाला, ‘‘पाकिस्तानविरुद्धची मालिका भारताने गमावल्यामुळे आता अखेरच्या सामन्यात त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि अन्य खेळाडूंना संधी द्यायला हवी.’’
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची झहीर अब्बास यांनी पाठराखण केली आहे. ते म्हणतात, ‘‘कर्णधार आपल्या बळावर सामने जिंकून देत नाही. संघाप्रमाणेच कर्णधार चांगला असावा, हे मान्य आहे. पण सामने जिंकण्यासाठी फलंदाज आणि गोलंदाजांनी योगदान देण्याची गरज असते. धोनीच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारताला पहिल्या सामन्यात समाधानकारक धावसंख्या उभारता आली. दुसऱ्या सामन्यातही धोनीनेच एकहाती किल्ला लढवला.’’
धोनीला हटवा -श्रीकांत
मायदेशातील मालिकांमध्ये इंग्लंडपाठोपाठ पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यात भारताला अपयश आल्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर कडाडून टीका होऊ लागली आहे. प्रत्येक पराभवानंतर भारतीय संघावर होणाऱ्या टीकेत वाढ होऊ लागली आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी ‘धोनीला हटवा, कोहलीकडे कर्णधारपद सोपवा,’
First published on: 05-01-2013 at 02:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhoni should leave his captaincy krishnamachary srikanth