वातावरणानुसार खेळपट्टीचा पोत बदलत असतो. आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये क्युरेटरला खेळपट्टी कशी बनवायला हवी हे सांगत नाही. सामन्यासाठी सर्वोत्तम खेळपट्टी बनवायला हवी आणि त्याचा अभिमान क्युरेटरला असायला हवा. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्युरेटरला पहिल्या दिवसापासून फिरकीला पोषक खेळपट्टी बनव, असे सांगणे चुकीचे आहे. त्याने असे करायला नको होते. त्याने क्युरेटरला असे सांगणे योग्य नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा महान लेग-स्पिनर शेन वॉर्न याने ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात व्यक्त केले. वॉर्न हा ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्सबरोबर समालोचनासाठी करारबद्ध झाला असून भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीपासून तो आपल्या या नव्या डावाला सुरूवात करणार आहे.
तो पुढे म्हणाला की, अश्विन हा एक गुणी फिरकीपटू आहे, त्याच्याकडे अचूकता आणि विविधता आहे. त्याचबरोबर प्रग्यान ओझा त्याला सुयोग्य साथ देत असून ही जोडी भारतासाठी नक्कीच चांगली आहे. भारतामध्ये फिरकी गोलंदाजी खेळणे सर्वात कठीण काम आहे. त्यामुळे इंग्लंडने खेळात बदल करायला हवा. या दौऱ्यामध्ये ते बरेच काही शिकतील. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे दोन्ही चांगले युवा खेळाडू भारताला भेटले आहेत. दुसऱ्या कसोटीसाठी नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असेल. जो संघ नाणेफेक जिंकेल त्याला फलंदाजी घेऊन प्रतिस्पध्र्यावर दबाव टाकता येईल. माझ्या मते ही मालिका भारतीय संघच जिंकेल.
सचिन तेंडुलकरला ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्कार देण्यात आला आणि त्यावर काही जणांनी टीका केली. यावर वॉर्न म्हणाला की, सचिन हा एक महान खेळाडू आहे, कोणत्याही देशाने सन्मान करावा असाच तो आहे. माझ्या मते तो या पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती होता.

Story img Loader