टीम इंडियाच्या कसोटी संघातला मुख्य गोलंदाज यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये आपल्या घरच्या संघाकडून पुनरागमन करतो आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून यंदा इशांत शर्मा खेळणार आहे. गेल्या काही हंगामात कोणत्याही संघ मालकाने इशांतवर बोली लावण्यास पसंती दर्शवली नव्हती. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील कामगिरीनंतर इशांतसाठी आयपीएलची दारं उघडली गेली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना इशांत शर्माने आपल्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या टप्प्यांविषयी भाष्य केलं. धोनीविषयी बोलत असताना इशांत शर्माने एक महत्वाची आठवण सांगितली. धोनीने आपल्याला अनेकदा संघातून बाहेर जाण्यापासून वाचवल्याचं इशांत म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“धोनीने मला अनेकदा संघातून बाहेर जाण्यापासून वाचवलं आहे. त्याने मला खूप पाठींबा दिला आहे. कित्येकदा विराटही सामन्यादरम्यान माझ्याकडे येऊन, मला आदराने काही गोष्टी विचारतो. मात्र संघातला अनुभवी गोलंदाज या नात्याने कितीही थकलो तरीही तुम्हाला काही गोष्टी या कराव्याच लागतात. सुरुवातीला केवळ गोलंदाजी करत राहणं हे माझं ध्येय होतं. मात्र यापुढे चांगल्या गोलंदाजीसोबत जास्तीत-जास्त विकेट काढणं हे देखील माझं ध्येय असणार आहे.” इशांत India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

कसोटी संघातला गोलंदाज असा शिक्का लागलेल्या इशांतला यंदा आयपीएलमध्ये आपली कामगिरी सुधारण्याची मोठी संधी मिळणार आहे. आगामी विश्वचषक संघासाठी आपण अद्याप आशा सोडल्या नसल्याचं इशांत म्हणाला. जर यंदा मी चांगली कामगिरी केली तर मला विश्वचषकात नक्कीच जागा मिळेल, असा आत्मविश्वास इशांतने बोलून दाखवला.

अवश्य वाचा – चौथ्या क्रमांकासाठी धोनीच योग्य पर्याय – अनिल कुंबळे