दुबई : अनेकांकडे माझ्या फोनचा क्रमांक आहे. मात्र, मी भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर केवळ महेंद्रसिंह धोनीने मला संदेश पाठवला, असा खुलासा विराट कोहलीने केला आहे.
कोहलीने गेल्या वर्षीच्या अखेरीस भारताच्या ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही काढण्यात आले. मात्र, तो आणखी काही वर्षे कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत राहील अशी अपेक्षा होती. परंतु जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर कोहलीने अचानकपणे कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले.
गेल्या वर्षभरातील या घडामोडी, धावांसाठी झगडावे लागत असल्याने लोकांकडून होणारी टीका आणि धोनीशी संवाद, यावर कोहलीने रविवारी आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भाष्य केले.
‘‘मी जेव्हा कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले, तेव्हा मला केवळ एका माजी सहकाऱ्याने संदेश पाठवला. तो सहकारी म्हणजे महेंद्रसिंह धोनी. अनेकांकडे माझ्या फोनचा क्रमांक आहे. अनेक जण टीव्हीवरून मला सल्ले देत असतात. मात्र, धोनी वगळता एकाही व्यक्तीने मला संपर्क केला नाही,’’ असे कोहली म्हणाला. ‘‘मला एखाद्या व्यक्तीला काही सांगायचे असल्यास मी थेट त्याच्याशी संपर्क साधेन. तुम्ही संपूर्ण जगासमोर मला काही सूचना करत असाल, तर त्याला फारसे महत्त्व नाही. तुमच्या सल्ल्यामुळे माझ्या खेळात सुधारणा होऊ शकेल असे वाटत असल्यास तुम्ही माझ्याशी थेट संवाद साधू शकता,’’ असे रोखठोक मतही कोहलीने व्यक्त केले.
कोहलीने कोणाचेही नावे घेतले नसले, तरी तो भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांच्याविषयी बोलत असल्याची शक्यता आहे. मला २० मिनिटे कोहलीला मार्गदर्शन करता आले, तर फलंदाजीत कोणते बदल करावेत हे मी त्याला सांगू शकेन, असे गावस्कर एका मुलाखतीत म्हणाले होते.
अपेक्षांचे दडपण न घेण्याचा प्रयत्न!
कोहलीने आशिया चषकाच्या तीन सामन्यांत १५४ धावा केल्या आहेत. त्याला सलग दोन अर्धशतके झळकावण्यात यश आले आहे. पुन्हा लय सापडत असल्याने तो समाधानी आहे. ‘‘मी १४ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. ही गोष्ट अशीच घडत नाही. त्यामागे प्रचंड मेहनत आहे. खेळावर मेहनत घेत राहणे, संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करणे, हे माझे काम आहे. संघ व्यवस्थापनाला माझ्यावर पूर्ण विश्वास असणे हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. मी खेळापासून काही वेळासाठी दूर गेलो, काही गोष्टींचा विचार केला. मी क्रिकेटचा आनंद घेणे गरजेचे आहे, अपेक्षांचे दडपण घेतल्यास मी सर्वोत्तम कामगिरी करू शकणार नाही, हे मला जाणवले,’’ असे कोहलीने नमूद केले.
कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला ज्या खेळाडूकडून संपर्क अपेक्षित होता, त्याचे नाव त्याने सांगावे आणि तो कोणत्या संदेशाची वाट पाहत होता हे देखील स्पष्ट करावे. विराट नक्की कोणत्या माजी सहकाऱ्यांबद्दल बोलत आहे, हे सांगणे अवघड आहे. त्याने स्वत: त्या खेळाडूंची नावे सांगितली पाहिजेत. – सुनील गावस्कर, भारताचे माजी कर्णधार