सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळायलाच हवा होता, पण त्याआधी तो हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना द्यायला हवा होता. कारण सचिनआधी त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला ओळख निर्माण करून दिली होती. पण सचिनला भारतरत्न मिळाल्यामुळे यापुढे खेळाडूंसाठी या पुरस्काराचा मार्ग खुला झाला आहे, असे मत महान धावपटू मिल्खा सिंग यांनी मांडले.
ते म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वीच निवृत्त झालेला विश्वव्रिकमवीर क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ हा सन्मान देण्याचा सरकारचा निर्णय योग्यच आहे. सचिन हा देशासाठी आदर्शवत असाच खेळाडू आहे आणि त्याचा सन्मान करणे योग्यच आहे. एक महान खेळाडू असूनही सचिनचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले आणि त्याने माणुसकी कायम जपली, असे मिल्खा सिंग म्हणाले.
‘‘मी सचिनला बऱ्याचदा भेटलो आणि तेव्हा त्याच्यामधील माणुसकी पाहून मी भारावून गेलो. एक खेळाडू म्हणून त्याने अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली आहे, पण तरीही त्याचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. त्यामुळेच सचिन हा अन्य यशस्वी खेळाडूंपेक्षा मोठा ठरतो,’’ असे मिल्खा सिंग म्हणाले.
खेळाडूंना राज्यपाल आणि राजदूत बनवावे
दांडगे वाचन आणि हुशार खेळाडूंची कमी नाही. त्यांना एखाद्या राज्याचे राज्यपाल आणि राजदूत बनवता येऊ शकते. जर राजकीय व्यक्ती किंवा निवृत्त प्रशासकीय व्यक्ती या पदावर बसू शकतात तर खेळाडू का नाही, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

Story img Loader