भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ३ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर पहिला टी-२० सामना रंगणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीतली प्रदुषणाची वाढती समस्या आणि हवेची खालावलेली पातळी पाहता, सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी होत आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरसह अनेक पर्यावरणवादीही दिल्लीत सामना खेळवण्याच्या विरोधात आहेत.

मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने हा सामना ठरवलेल्या वेळेनुसारच होईल असं स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयच्या या भूमिकेवर अभिनेत्री दिया मिर्झा चांगलीच भडकली आहे. दियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, बीसीसीआयच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.

परिस्थितीचा अंदाज असतानाही, बीसीसीआय सामना खेळवण्यावर ठाम आहे ही भूमिका चीड आणणारी असल्याचं दियाने म्हटलं आहे. दरम्यान भारतामध्ये दाखल झालेल्या बांगलादेशच्या संघातील काही खेळाडूंनी चेहऱ्यावर मास्क लावत सराव करतानाचे काही फोटो प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. मात्र सौरव गांगुलीने घेतलेल्या भूमिकेनंतर या सामन्याबद्दलचा संभ्रम आता दूर झाला आहे.

Story img Loader