संकटे एकामागून एक येत राहिली की आपल्यावर साडेसाती आली असे आपण म्हणतो. भारतीय क्रीडा क्षेत्राबाबत असेच काहीसे दिसून येऊ लागले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय ऑलिम्पिक महासंघावर (आयओए) बंदीची कुऱ्हाड टाकली नाही तोच कुस्ती हा क्रीडाप्रकारच २०२० च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून काढून टाकण्याचा निर्णय आयओसीने घेतला.
आयओसीचा हा निर्णय भारतासाठी खूपच धक्कादायक आहे. कारण आता कुठे भारतास कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदकाच्या आशा दिसू लागल्या होत्या. वाळवंटात पाण्यासाठी खूप वणवण केल्यानंतर लांबवर थोडेसे पाणी दिसल्यावर आपल्याला खूप आनंद वाटतो. मात्र जवळ गेल्यानंतर लक्षात येते की ते मृगजळच आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राची तशीच अवस्था झाली आहे. बीजिंग २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्ती व बॉक्सिंगमध्ये प्रत्येकी एक कांस्य तर नेमबाजीत सुवर्णपदक मिळविल्यानंतर भारताची आता ऑलिम्पिकमध्ये सकारात्मक वाटचाल सुरू झाली आहे असे वाटले होते. त्यानंतर लंडन येथे सहा पदकांची कमाई झाल्यानंतर भारतास क्रीडा क्षेत्रात गौरवशाली मार्ग सापडला असे वाटू लागले. अर्थात भारताचा हा आनंद क्षणिकच ठरला. आयओएने निवडणुकांबाबत आयओसीच्या नियमावलींचे पालन केले नाही म्हणून आयओसीने आयओएवर बंदी घातली. आयओएने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या नियमावलीनुसार या निवडणुका घेतल्या होत्या, तरीही ही बंदी आल्यामुळे आयओएची ना घरका ना घाटका अशी स्थिती झाली. हे नाही होत तोच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने अखिल भारतीय बॉक्सिंग महासंघावर बंदी घातली. अन्य खेळांच्या काही राष्ट्रीय संघटना आयओसीच्या बंदीच्या रडारवर आहेत. बॉक्सिंग, नेमबाजी व अन्य एक दोन क्रीडा प्रकारांबाबतही ऑलिम्पिकच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहेत आणि येऊ घातले आहेत. हे बदल भारतीय खेळाडूंसाठी अतिशय त्रासदायक ठरणार आहेत.
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करून बक्कळ आर्थिक कमाई करण्याच्या हेतूने आजकाल अनेक देश ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. अर्थात सगळ्याच देशांना अशा स्पर्धाद्वारे देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होतेच असे नाही. या स्पर्धा आयोजित केल्यानंतर संयोजक देशाची आर्थिक स्थिती डबघाईला गेल्याची यापूर्वीची अनेक उदारहणे आहेत. तरीही जगात प्रतिष्ठा मिळविण्यासाठी आणि मिरवण्यासाठी अनेक देश ऑलिम्पिकच्या संयोजनात उडय़ा घेतात. अशी उडी घेतल्यानंतर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आपल्या मनास येईल ते खेळ या स्पर्धेसाठी घेण्याकरिता त्यांची धडपड सुरू होते. त्यामध्ये एखाद्या पारंपरिक खेळाची आहुती गेली तरी त्याची पर्वा त्यांना नसते. कुस्तीबाबत असेच काहीसे घडले आहे.
आयओसीच्या सध्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना हा गरिबांचा क्रीडा प्रकार ऑलिम्पिकच्या श्रेष्ठ क्रीडा प्रकारांमध्ये योग्य वाटत नाही. सर्वसाधारणपणे कुस्ती, अ‍ॅथलेटिक्स (विशेषत: लांब अंतराच्या शर्यती)या क्रीडाप्रकारांमध्ये कारकीर्द करणारे बहुतांश खेळाडू आर्थिकदृष्टय़ा बेताची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील असतात. ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी या खेळाडूंना किती झगडावे लागते, किती आर्थिक व मानसिक तणाव सहन करावे लागतात हे आयओएच्या कार्यकारिणीत बसलेल्या संघटकांपैकी एक दोन संघटकांनाच माहीत असते. बाकीचे पदाधिकारी आपले पद कसे राहील व आपल्याला विविध देशांचे दौरे कसे करता येतील यातच मशगुल असतात. ऑलिम्पिक स्पर्धा संयोजनपद मिळावे यासाठी अशा पदाधिकाऱ्यांना विविध प्रलोभने दिली जातात. तसेच आपल्या क्रीडाप्रकाराचा समावेश ऑलिम्पिकमध्ये व्हावा यासाठीही प्रलोभने दाखविली जातात. कुस्तीकरिता पुरस्कर्ते मिळविताना मारामार होते तर कुस्ती संघटक स्वत:चा खेळ ऑलिम्पिकमध्ये रहावा यासाठी आयओसीला कसे ‘मॅनेज’ करू शकणार.
कुस्तीला ऑलिम्पिकच्या आखाडय़ात मूठमाती देण्याचा सगळ्यात जास्त फटका भारतास बसणार आहे. सुशीलकुमारने बीजिंगमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक मिळविल्यानंतर देशात कुस्तीविषयी अनुकूल वातावरण तयार होऊ लागले होते. लंडन येथे त्याने रौप्यपदक मिळविले तर योगेश्वर दत्त याने कांस्यपदक मिळविल्यानंतर कुस्तीत कारकीर्द करू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढली होती. आता कुस्ती हा खेळ ऑलिम्पिक क्रीडा प्रकार राहिला नाही तर आपोआपच या खेळासाठी मदत करणाऱ्यांचे हात आखडले जाणार. बुद्धिबळ या खेळाच्या ऑलिम्पियाड होत असल्या तरी हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार नाही असे मानून एका मोठय़ा उद्योगसमूहाने महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या बुद्धिबळपटूंना पुरस्कृत करण्यास सपशेल नकार दिला होता. हे उदारहण लक्षात घेत यापुढे कुस्तीस प्रायोजकत्व देण्यासाठी कोणी पुढे येईल काय हीच मोठी समस्या आहे.
नेमबाजांचे दु:ख काही वेगळे नाही. त्यांच्या राष्ट्रीय संघटनेवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची ‘नजर’ आहे. राष्ट्रीय क्रीडा संघटनांनी ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना पदाधिकारी म्हणून नेमू नये असे त्यांनी सुचविले असताना नेमबाजीच्या संघटनेने एका नव्वद वर्षांच्या संघटकास संघटनेवर मोठे पद दिले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघानेही केलेले बदल भारतीय खेळाडूंना त्रासदायक आहेत. आता नवीन नियमावलीनुसार अंतिम फेरीत पात्र ठरलेल्या खेळाडूंचे प्राथमिक फेरीतील गुण पुढे मोजले जाणार नाहीत. अंतिम फेरीत शून्यापासूनच सुरुवात होईल. भारतीय नेमबाज प्राथमिक फेरीत चांगली कामगिरी करतात व अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर दडपण घेतात. आता शून्यापासून सुरुवात करायची म्हणजे त्यांच्यावर आणखीनच दडपण येणार आहे.
बॉक्सिंगमधील ऑलिम्पिक पात्रता निकष काहीसे कठीण झाले आहेत. साहजिकच कुस्ती व नेमबाजीप्रमाणेच बॉक्सिंगमध्येही ऑलिम्पिक प्रवेशकरिता भारतीय खेळाडूंना झगडावे लागणार आहे. त्यातच भारतीय बॉक्सिंग संघटनेवरील बंदी अद्याप उठविलेली नाही. त्यामुळेही या खेळाडूंवर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही विविध राष्ट्रीय क्रीडा संघटनांनी क्रीडा नियमावलीची अंमलबजावणी नाही केली तर संलग्नता काढून घेण्याची धमकी दिली आहे. एकूणच भारतीय क्रीडा क्षेत्र साडेसातीतून जात आहे असेच म्हणावे लागेल.

Story img Loader