भारताच्या २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आणि सुवर्णपदक पटकावलं. देशासाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. या कामगिरीनंतर नीरजवर देशच काय तर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाला आहे. याच दरम्यान, या सामन्यात पदकासाठी मैदानात असणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही खास शब्दांमध्ये नीरजचं कौतुक करत अभिनंदन केल्याचं ट्विट शनिवारी (७ ऑगस्ट) समोर आलं होतं. मात्र, आता असं काहीच घडलं नसून नदीमने नीरजचं अभिनंदन केलं नसल्याची माहिती मिळत आहे. मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं ते ट्विटर अकाऊंट नदीमचं नसून फेक अकाऊंट असल्याची माहिती समोर येत आहे.
सामना संपल्यानंतर अर्शद नदीमच्या नावाने एक ट्विट समोर आलं होतं. या ट्विटमध्ये आपल्याला पदक न मिळाल्याबद्दल आपल्या देशाची माफी मागणारा आणि भारताच्या नीरजचं अभिनंदन करणारा मजकूर लिहिला होता. अर्शद नदीमच्या नावाने समोर आलेल्या त्या ट्विटमध्ये असा मजकूर होता कि, “माझा आदर्श असणाऱ्या निरज चोप्राला विजयाबद्दल अभिनंदन. तसेच पाकिस्तानची मी माफी मागतो मला देशासाठी पदक जिंकता आलं नाही. इतकंच नव्हे तर अगदी काहीच वेळात हे ट्विट प्रचंड व्हायरल देखील झालं होतं. मात्र, त्यानंतर हे ट्विटर अकाऊंट फेक असल्याचं समोर आलं असून आता हे ट्विट देखील डिलीट करण्यात आलं आहे.
अंतिम फेरीत नदीमचाही समावेश
चेक रिपब्लिकच्या वडलेज आणि वेसेलीने अनुक्रमे रजत आणि कांस्य पदकावर नाव कोरलं. नीरजसह १२ स्पर्धक अंतिम फेरीत होते ज्यात नदीमचाही समावेश होता. वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक अंतिम सामन्यात खेळले.
नदीम पाचव्या स्थानी…
अंतिम सामन्यामध्ये नदीम पाचव्या स्थानी राहिला. नदीमने ८४.६२ मीटरपर्यंत भाला फेकला. नदीमच्या आदी जर्मनीचा वेबर ने चौथा क्रमांक पटावला. वेबर ने ८५.३० मीटरपर्यंत भाला फेकला.
नीरज यापूर्वी कोणत्या स्पर्धांमध्ये जिंकलाय?
नीरजने यापूर्वी आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिलं आहे.