Team India ICC World Cup 2023 coach and support staff squad: भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्डकप स्पर्धेत दहाच्या दहा सामने जिंकत दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर भारतीय खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय आहे. विराट कोहली स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. मोहम्मद शमी झंझावाती फॉर्ममध्ये आहे. रविवारी अहमदाबाद इथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम मुकाबल्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. जवळपास दीड महिना देशभरात विविध ठिकाण खेळून जिंकत भारतीय संघाने ही वाटचाल केली आहे. प्रचंड उष्णता आणि आर्द्रता अशा वातावरणात खेळणं जिकिरीचं आहे पण भारतीय संघाने हाही अडथळा पार केला आहे. खेळाडूंच्या बरोबरीने पडद्यामागे सपोर्ट स्टाफची एक मोठ्ठी टीम कार्यरत आहे. वर्ल्डकपच्या निमित्ताने जाणून घेऊया भारतीय संघातल्या या पडद्यामागच्या शिलेदारांबद्दल.
राहुल द्रविड
तंत्रशुद्ध फलंदाजीचा वस्तुपाठ, भारतीय संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड हे क्रिकेटविश्वातल्या आदरणीय नावांपैकी एक. १६४ कसोटी आणि ३४४ एकदिवसीय एवढा प्रचंड अनुभव द्रविड यांच्या नावावर आहे. भारताच्या सार्वकालीन महान खेळाडूंपैकी एक. निवृत्तीनंतर समालोचन आणि नॅशनल क्रिकेट अकादमीचं प्रमुखपद त्यांनी सांभाळलं. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे मेन्टॉर म्हणून काम पाहिलं. २०१५ पासून भारताच्या U१९ आणि भारतीय अ संघाचं प्रशिक्षकपद द्रविड यांनी सांभाळलं. द्रविड यांच्या मार्गदर्शनात भारताने U१९ संघाने जेतेपदावर नाव कोरलं. असंख्य युवा खेळाडूंच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा. २०२१ मध्ये द्रविड यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. अर्जुन तसंच पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित. १९९९, २००३ आणि २००७ वर्ल्डकप स्पर्धेत द्रविड यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. दोन वर्षांपूर्वी द्रविड यांनी वर्ल्डकपच्या दृष्टीने काम सुरू केलं. आहे. खेळाडूंची फळी उभारणं, दुखापतींचं व्यवस्थापन, वर्कलोड मॅनेजमेंट या सगळ्यात द्रविड यांची भूमिका मोलाची.
विक्रम राठोड
द्रविड यांचे समकालीन विक्रम राठोड हे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. त्यांनी ६ कसोटी आणि ७ एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये १०,०००हून अधिक धावा राठोड यांच्या नावावर आहेत. इंग्लंडमध्ये काही वर्ष वास्तव्यानंतर राठोड मायदेशी परतले. पंजाब संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलं. भारतीय संघाचे निवडसमिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. संजय बांगर यांच्या जागी राठोड यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. खेळाडूंच्या तंत्रात सुधारणा सुचवणं, एखादा कच्चा दुवा असेल तर त्यावर काम करणं, प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा अभ्यास करुन त्यानुसार फलंदाजांसाठी योजना आखणं हे राठोड यांचं काम आहे.
पारस म्हांब्रे
राहुल द्रविड एनसीएमध्ये कार्यरत असताना पारस म्हांब्रे त्यांच्या कोअर टीमचा भाग होते. मुंबईकर म्हांब्रे यांनी २ कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळताना त्यांच्या नावावर २८४ विकेट्स आहेत. त्यांच्या नेतृत्वात मुंबईने रणजी करंडक जिंकला होता. निवृत्तीनंतर म्हांब्रे यांनी एनसीएमध्ये प्रशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केला. म्हांब्रे यांनी महाराष्ट्र आणि त्यानंतर बंगाल संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं. त्यांच्या मार्गदर्शनात बंगालने रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. बडोदा आणि विदर्भ संघाचं प्रशिक्षकपदाचाही अनुभव. आयपीएल स्पर्धेत म्हांब्रे चार वर्ष मुंबई इंडियन्स संघाच्या कोचिंग टीमचा भाग होते. भारतीय गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय दर्जा, सातत्य आणि भेदकता मिळवून देण्यात माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हांब्रे यांनी ती परंपरा समर्थपणे सुरू ठेवली. वर्ल्डकपदरम्यान भारतीय गोलंदाज विकेटचा आनंद साजरा करताना म्हांब्रे यांच्या दिशेने खूण करतात.
टी. दिलीप
वर्ल्डकपदरम्यान सामना संपल्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी संघाच्या बैठकीत पुरस्कार दिला जातो. पुरस्काराची घोषणा अनोख्या पद्धतीने होते. कधी ड्रोन कॅमेरा विजेत्याचं नाव घेऊन येतो, कधी मैदानातल्या जायंट स्क्रीनवर नाव स्पष्ट होतं. कधी माजी खेळाडू विजेत्याची घोषणा करतात. क्षेत्ररक्षणाचं महत्त्व ठसवण्यात टी. दिलीप यांची भूमिका निर्णायक आहे. सामन्यादरम्यान कठीण झेल टिपल्यानंतर, अचूक थ्रोसह स्टंप्स उडवल्यानंतर खेळाडू दिलीप यांच्या दिशेने पाहतात. क्षेत्ररक्षणासाठीचा पुरस्कार मला मिळायला हवा असं गंमतीत सांगतात. नव्वदीच्या दशकात भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण सर्वसाधारण असे. कालौघात भारतीय खेळाडूंनी या आघाडीवर सातत्याने काम केलं आहे. स्वत: अतिशय फिट असणाऱ्या दिलीप यांनी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. हैदराबादचे दिलीप यांनी आयपीएलमधल्या डेक्कन चार्जर्स संघाबरोबर काम केलं आहे. एनसीएमध्ये दशकभर काम केलं आहे. दिलीप यांना सुरुवातीला कुटुंबाचा पाठिंबा नव्हता. ते लहान मुलांच्या गणिताच्या शिकवण्याही घेत. खेळाडूंचे मित्र होऊन त्यांना चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात दिलीप वाकबगार आहेत.
रिझवान खान
भारतीय संघाचे डॉक्टर आहेत. गेल्या वर्षी आयपीएल विजेत्या गुजरात टायटन्स संघाचा ते भाग होते. याआधी दिल्ली कॅपिटल्स संघाचे डॉक्टर म्हणूनही काम पाहिलं आहे. वर्ल्डकप ही प्रदीर्घ काळ चालणारी स्पर्धा आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंना काही अडचण उद्भवल्यास डॉक्टर मैदानात धाव घेतात.
अरुण कानडे आणि राजीव कुमार
क्रिकेट हा शारीरिक कष्टाचा खेळ आहे. सलग ८ ते ९ तास खेळायचं असतं. वर्ल्डकप ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होतो आहे. धरमशालाचा अपवाद वगळता बाकी सगळीकडे प्रचंड उष्ण आणि आर्द्र वातावरण आहे. मैदानात अर्धा तास काढला तरी जर्सी घामाने ओलीचिंब होते आहे. दमलेल्या खेळाडूंना मसाज करुन देण्याचं काम अरुण कानडे आणि राजीव कुमार करतात. थकलेल्या गात्रांना चालना देण्याचं कठीण काम हे दोघे करतात. मराठमोळे कानडे गेली अनेक वर्ष भारतीय संघाबरोबर आहेत. आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या ताफ्यातही ते होते. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि कानडे यांची खास गट्टी आहे.
रघू
थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघू हे भारतीय संघातले लोकप्रिय शिलेदारांपैकी एक आहेत. फलंदाजांना चांगल्या वेगाचा आणि उसळत्या चेंडूंचा सामना करुन देणं हे रघू यांचं काम आहे. अर्ध्या पिचपासून हातातल्या साईडआर्म या उपकरणाद्वारे ते फलंदाजांना अतिशय जोरात चेंडू टाकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज वेगवान आणि उसळत्या चेंडूचा मारा करतात. त्या माऱ्याचा सराव रघू भारतीय खेळाडूंना करुन देतात. महेंद्रसिंग धोनी रघू यांना संघातला एकमेव विदेशी खेळाडू असं म्हणत असे. मूळचे कर्नाटकचे रघू नव्वदच्या दशकात मुंबईत आले. त्यानंतर बंगळुरू इथल्या एनसीएमध्ये त्यांचं कौशल्य राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांनी हेरलं. तेव्हापासून रघू भारतीय संघाच्या सेवेत आहेत. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. मैदान ओलसर असल्याने गोलंदाजांच्या बूटाला माती चिकटून राहत होती. रघू यांनी आपल्याकडचं एक उपकरण घेऊन बूटाच्या खालच्या बाजूला लागलेली माती खरवडून काढून देण्याचं काम केलं. त्यांच्या या कृतीचं खूप कौतुक झालं होतं. सराव सत्रात सगळ्यात आधी येणारे आणि सगळ्यात शेवटी बाहेर पडणारे रघू असतात. प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर, शांत आणि मितभाषी रघू भारतीय संघाच्या वाटचालीतले महत्त्वाचे साथीदार आहेत.
नुवान
श्रीलंकेचे नुवान हे रघू यांच्याबरोबरीने थ्रो डाऊन स्पेशालिस्ट म्हणून काम पाहतात. एखाद्या शरीरसौष्ठवपटूला शोभेल अशी शरीरयष्टी असणारे नुवान डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा सामना कसा करावा यासाठी नुवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेग आणि अचूकतेसह ते फलंदाजांना हैराण करतात. त्यांच्यामुळेच भारतीय फलंदाज ट्रेंट बोल्ट, शाहीन शहा आफ्रिदी, मुस्ताफिझूर रहमान, मिचेल स्टार्क, मार्को यान्सन यांचा आत्मविश्वासाने सामना करु शकतात.
हरीप्रसाद मोहन
व्हीडिओ अॅनालिस्ट म्हणून काम पाहतात. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे कच्चे दुवे काय आहेत, आपल्या संघाच्या कामगिरीत कुठे सुधारणा हवी आहे, कोणाच्या तंत्रात गडबड दिसते आहे, कुठल्या गोलंदाजांची अॅक्शन त्रासदायक ठरु शकते या सगळ्याचे व्हीडिओ अभ्यासून प्रशिक्षकांना, खेळाडूंना माहिती देणं, सुधारणा करण्यासाठी मदत करणं हे त्यांचं काम आहे.
सोहम देसाई
स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच. २०१७ पासून ते भारतीय संघाबरोबर आहेत. गुजरात संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये ते होते. खेळाडूंकडून वेगवेगळी फिटनेस ड्रिल्स करुन घेणं हे त्यांचं काम आहे. सामन्यासाठी खेळाडूंना फिट ठेवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. खेळाडूंसाठी डाएट पॅटर्न ठरवून देणं हाही त्यांच्या कामाचा भाग आहे.
दयानंद गरानी
थ्रो डाऊन स्पेशालिस्ट. आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन संघाबरोबर काम केलं आहे. मध्यमगती गोलंदाज असणाऱ्या दयानंद यांनी कोलकाता पोलिसांसाठी स्वयंसेवक म्हणूनही काम केलं आहे. आंध्र प्रदेश संघाबरोबर काम केलं आहे. इस्ट मिदनापोर जिल्ह्यातल्या जमातिया हे त्यांचं मूळ गाव.
कमलेश जैन
हेड फिजिओ म्हणून कमलेश काम पाहतात. नितीन पटेल एनसीएमध्ये रवाना झाल्यानंतर कमलेश यांनी सूत्रं स्वीकारली. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे फिजिओ म्हणून काम पाहिलं आहे. खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका.
योगेश परमार
असिस्टंट फिजिओ म्हणून योगेश काम पाहतात. एनसीएच्या ताफ्यातील आणखी एक जुना शिलेदार. भारतीय U19 संघाबरोबर काम केलं आहे. वेगवान गोलंदाजांना ज्या समस्या उद्भवतात त्यांचं निराकरण योगेश करतात. खेळाडूंचं वर्कलोड मॅनेजमेंट हाताळण्याची जबाबदारी.
आनंद सुबम्रण्यम
माध्यम समन्वयाचं काम आनंद बघतात. भारतीय संघाचा कर्णधार प्रसारमाध्यमांशी संवाद साधतो. पत्रकार परिषदेचं आयोजन करणं, त्याची माहिती-अपडेट पोहोचवणं, त्यावेळी उपस्थितांना प्रश्न विचारण्याची संधी देणं हे सगळं काम आनंद करतात. नाणेफेकेवेळी अंतिम संघाचा कागद तयार करणं, त्याची माहिती प्रसारमाध्यमांना देणं हे कामही आनंद करतात. ड्रेसिंगरुममध्ये चालणाऱ्या गंमतीजंमती, बीटीएस हे याचं नियोजनही तेच करतात.
ऋषिकेश उपाध्याय
लॉजिस्टिक्स मॅनेजर. भारतीय संघ जिथेही जातो तिथे चाहत्यांची झुंबड उडते. भारतीय संघाच्या सराव सत्रालाही हजारो चाहते उपस्थित असतात. भारतीय संघाचं जाणंयेणं, सुरक्षाव्यवस्था, किट आणि अन्य सामानाचं वहन याची जबाबदारी ऋषिकेश बघतात.
एस. रजनीकांत
देशातल्या अग्रगण्य स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षकांपैकी रजनीकांत एक आहेत. त्यांनी मुंबई इंडियन्स संघाबरोबर काम केलं. २०२१ मध्ये हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना दुखापतीतून सावरण्यात यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती.
अमित सिद्धेश्वर
बीसीसीआयच्या ऑपरेशन्स विंगचा महत्त्वाचा भाग आहेत. वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या लॉजिस्टिक्सची जबाबदारी यांच्याकडे आहे. भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत ९ विविध ठिकाणी सामने खेळले. विमानतळ ते हॉटेल, हॉटेल ते स्टेडियम हा प्रवास, त्याचं नियोजन, सुरक्षाव्यवस्था, खेळाडूंचं किट हे सगळं अमित पाहतात. भारतीय महिला क्रिकेट संघाबरोबर ते असायचे. दोन ते तीन महिने देशभरात विविध ठिकाणी रणजी करंडक स्पर्धेचे सामने होतात. त्या स्पर्धेच्या यशस्वी संयोजनाचं श्रेय अमित यांना जातं.