Australia vs Sri Lanka, World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेतील १४व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर सोमवारी (१६ ऑक्टोबर) विजयासह त्याने स्पर्धेत आपले खाते उघडले. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रीलंकेविरुद्धच्या विजयासह पाचवेळच्या चॅम्पियन संघाचे दोन गुण झाले. सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी मिचेल मार्शला त्याच्या आक्रमक फलंदाजी संदर्भात काही प्रश्न विचारले. त्यावर मार्शने दिलखुलासपणे उत्तरे दिली.
ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवल्यानंतर मिचेल मार्श आणि भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्यात मिचेलने केलेल्या विस्फोटक फलंदाजीबद्दल मजेशीर गप्पा झाल्या. त्या गप्पांमध्ये गावसकर यांनी मिचेलचे वडील जोफ मार्श यांच्या फलंदाजीची आठवण काढली. जोफ मार्श यांच्या कारकिर्दीत ११७ एकदिवसीय सामन्यात त्यांचा स्ट्राइक-रेट हा त्यांच्या मुलाच्या तुलनेत फारच कमी म्हणजे ५५.३३ असा होता. मिचेलचा आतापर्यंतच्या सामन्यात त्याचा स्ट्राइक-रेट हा ९३.८५ इतका आहे. गावसकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत जोफ मार्श यांच्याबरोबर भरपूर क्रिकेट खेळले असून आज ते त्यांच्या मुलाच्या फलंदाजीवेळी समालोचन करत होते. यावेळी त्यांनी दोघांमधील फलंदाजीची तुलना केली आहे.
सुनील गावसकर यांनी मिचेल मार्शला “तुझ्या वडिलांनी तुला डिफेन्स शॉट खेळायला शिकवले नाही का? (बचावात्मक फटके) तुझे मोठे फटके पाहून मी अवाक् झालो.” गावसकरांच्या या प्रश्नांवर मार्शने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, “मी फक्त आमच्या संघाचा खराब स्ट्राइक-रेटची भरपाई करत होतो.” यानंतर एकच तिथे एकच हशा पिकला.
श्रीलंकेविरुद्धचा विजय ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत आवश्यक होता. जर त्यांचा या सामन्यातही पराभव झाला असता तर त्यांना विश्वचषक २०२३ची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता कमी झाली असती. जर ऑस्ट्रेलियाने हा विश्वचषक जिंकला तर मिचेल मार्श आणि जोफ मार्श विश्वचषक जिंकणारी पहिली पिता-पुत्रांची जोडी ठरले. १९८७ साली भारतात झालेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच विजय मिळवला होता. त्या विजयी संघाचे ते एक सदस्य होते.
मार्श आणि इंग्लिशने झळकावले अर्धशतक
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दोन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. जोश इंग्लिशने सर्वाधिक ५८ धावा केल्या. मिचेल मार्शने ५२ धावांची खेळी केली. मार्शन लाबुशेनने ४० धावा केल्या आणि इंग्लिशसोबत चौथ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. ग्लेन मॅक्सवेल ३१ आणि मार्कस स्टॉयनिस २० धावांवर नाबाद राहिला. डेव्हिड वॉर्नर ११ धावा करून बाद झाला. स्टीव्ह स्मिथला खातेही उघडता आले नाही.