दिएगो फोर्लान याने आपल्या १००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विजयी गोल लगावून उरुग्वेला कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या उंबरठय़ावर आणून ठेवले आहे. फोर्लानच्या निर्णायक गोलमुळे उरुग्वेने नायजेरियाचे आव्हान २-१ असे परतवून लावले.
कर्णधार दिएगो लुगानो याने १९व्या मिनिटाला गोल करून उरुग्वेला आघाडीवर आणले. पहिल्या सत्राच्या आठ मिनिटे आधी जॉन मायकेल ओबी याने अप्रतिम कौशल्य दाखवत नायजेरियाला बरोबरी साधून दिली. पण ५१व्या मिनिटाला फोर्लानने उरुग्वेला पुन्हा आघाडीवर आणले. फोर्लानने ३४वा आंतरराष्ट्रीय गोल झळकावत उरुग्वेकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. या विजयानंतर नायजेरिया आणि उरुग्वेचे समान तीन गुण झाले आहेत. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी उरुग्वेला ताहितीचा तर नायजेरियाला बलाढय़ स्पेनचा सामना करावा लागणार आहे.

Story img Loader