आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाची मालकी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद सांभाळणे, यात कुठेही हितसंबंध नाहीत, असा एन. श्रीनिवासन यांचा दावा स्वीकारणे कठीण आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले आहे.
न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे की, हितसंबंध आणि पक्षपत यांच्यात साम्य आहे. प्रत्यक्षात पक्षपातीपणा या प्रकरणात नसेल, परंतु त्याची शक्यता तर दिसते आहे आणि ती महत्त्वाची आहे. क्रिकेटमधील शुद्धता जपायला हवी आणि या प्रकरणातील नियंत्रण व्यवस्था ही संशयास्पद आहे.
‘‘तुम्ही इंडिया सिमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक आहात, इंडिया सिमेंट्सच्या मालकीचा चेन्नई सुपर किंग्जचा संघ आहे, याच संघाचा अधिकारी सट्टेबाजीत सामील आहे आणि तुम्ही बीसीसीआयचे प्रमुख आहात. सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेता या प्रकरणात हितसंबंधांचा काडीमात्र संबंध नाही, हे मान्य करणे कठीण आहे,’’ असे न्या. एफ. ए. आय. कलिफुल्ला यांचा समावेश असलेल्या असलेल्या खंडपीठाने श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल यांना सांगितले.
हितसंबंध स्पष्ट करण्यासाठी सिब्बल यांनी यावेळी हॉकी महासंघ आणि फिफाचे दाखले दिले. परंतु बीसीसीआयच्या निवडणूक प्रक्रियेनंतर माजी न्यायाधीश मुदगल यांच्या अहवालानुसार दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे खंडपीठाने नमूद केले. बीसीसीआयच्या निवडणुकीस कोणाला लढता येईल, हा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. आपण जर ठरवले तर बीसीसीआय सर्व वाईट प्रवृत्तींपासून दूर राहील. समितीने निवडणूक लढण्यास परवानगी दिलेली व्यक्ती लढू शकते, असे सांगण्यात आले.
या खंडपीठाने म्हटले की, ‘‘क्रिकेट प्रशासक हा बीसीसीआय आणि आरोपविरहित असावा. जेणेकरून तो अहवालातील निष्कर्षांआधारे योग्य कारवाई करू शकेल.’’
‘‘संघांच्या खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही म्हणत नाही. परंतु जर तुम्ही एखाद्या संघाचे मालक असता तेव्हा संघाबाबतचे तुमचे प्रेम आणि क्रिकेट प्रशासन या दोन्ही गोष्टी भिन्न दिशांना राहतात,’’ असे खंडपीठाने श्रीनिवासन यांना सुनावले. हे प्रकरण लोकांच्या नजरेतून पाहण्यात येत आहे, ज्यांचे क्रिकेटवर निस्सीम प्रेम आहे आणि ते या खेळावर धर्माप्रमाणे प्रेम करतात, असे खंडपीठाने पुढे म्हटले.

Story img Loader