World Cup scheduled 2023: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक स्पर्धेत १५ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्याची तारीख बदलली जाऊ शकते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आधीच वेळापत्रक निश्चित केले असेल, परंतु सामन्याचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते. याबाबत गुरुवारी (२७ जुलै) बीसीसीआयची बैठक झाली. काही सामन्यांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो याची पुष्टी झाली आहे. यामध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांचाही समावेश आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
वास्तविक, ज्या दिवशी दोन्ही संघांमध्ये हा महामुकाबला होणार आहे तो दिवस नवरात्रीचा पहिला दिवस आहे. त्यादिवशी गुजरातमध्ये रात्रभर गरबा नृत्य होते, संपूर्ण राज्यात हा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव एजन्सींनी बीसीसीआयला सामना इतर तारखेला हलवण्याचा सल्ला दिला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले होते की, हा सामना नियोजित वेळेच्या एक दिवस अगोदर १४ ऑक्टोबर रोजी होऊ शकतो. मात्र, बीसीसीआयच्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करणे एवढे सोपे असणार नाही. यामुळे अनेक गोष्टींवर परिणाम होऊ शकतो.
बीसीसीआयसमोरील आव्हाने
एका दिवसात तीन सामने होणे कठीण : भारत-पाकिस्तान सामना पूर्वनिर्धारित वेळापत्रकाऐवजी १४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्याचे नियोजन आहे. जर असे झाले तर त्या दिवशी तीन सामने होतील. त्या दिवशी न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे सकाळी १०.३० वाजल्यापासून सामना सुरु होणार आहे. त्याचवेळी दिल्लीत दुपारी दोनपासून इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. अशा स्थितीत एका दिवसात तीन सामने झाल्याने अडचणी वाढणार आहेत.
पाकिस्तानला ७२ तासांत दोन सामने खेळावे लागतील: जर १४ ऑक्टोबरला सामना झाला तर पाकिस्तानी संघाला ७२ तासांत दोन सामने खेळावे लागतील. ते १२ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. यानंतर दोन दिवसांनी त्यांना हा हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा सामना करावा लागू शकतो आणि जे पाकिस्तानी संघाला अजिबात नको असेल.
ब्रॉडकास्टर संतापतील: जर एका दिवसात तीन सामने झाले तर वर्ल्डकपचे ब्रॉडकास्टर नाराज होतील. भारत-पाकिस्तान सामना झाल्यास उर्वरित दोन सामन्यांचे महत्त्व कमी होऊ शकते. ब्रॉडकास्टरला तीन सामने टेलिकास्ट करण्यात समस्या येऊ शकतात. त्यांना कोणत्याही परिस्थितीत एका दिवसात तीन सामने नको आहेत. असे झाल्यास बीसीसीआयला ब्रॉडकास्टरच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते.
हॉटेलसह अनेक गोष्टींच्या आगाऊ बुकिंगवर परिणाम: या सामन्यासाठी हजारो चाहते अहमदाबादला पोहोचणार आहेत. जर सामन्याचे वेळापत्रक बदलले तर चाहत्यांचे मोठे हाल होऊ शकतात. त्यांनी प्रवासाचे आराखडे आधीच निश्चित केले आहेत. त्या सामन्यासाठी अहमदाबादमधील जवळपास सर्व हॉटेल्स बुक झाली आहेत. चाहत्यांनी रूग्णालयात बेडसाठी संपर्क साधला आहे. वेळापत्रकात बदल झाल्यास मोठ्या प्रमाणावर हॉटेल बुकिंग रद्द होण्याची शक्यता आहे.
नवीन वेळापत्रकासाठी पाकिस्तानची तयारी: अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तान आधीच कचरत होता. नवीन वेळापत्रकात बदल करण्यासाठी त्यांना पटवणे अधिक कठीण होईल. पाकिस्तानमुळे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर झाला होता. मात्र, आता बीसीसीआयच्या गलथानपणामुळे हे बोगावे लागत आहे. असा उलटा आरोप पीसीबी करेल. बीसीसीआयने वेळापत्रकात बदल करण्यासाठी आयसीसीला पत्र लिहिले आहे, परंतु पाकिस्तान याला सहमती देतो की नाही हे पाहणे बाकी आहे. पीसीबी पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न करतील.
बीसीसीआयचे यावर काय म्हणणे आहे?
बीसीसीआयचे सचिव शाह यांनी पुष्टी केली आहे की, “आयसीसीच्या तीन पूर्ण सदस्यांनी त्यांचे आक्षेप व्यक्त केल्यानंतर विश्वचषक २०२३च्या वेळापत्रकात काही बदल होऊ शकतात.” ते प्पुढे म्हणाले, “तीन सदस्य राष्ट्रांनी त्यांच्या विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल करण्यासाठी आयसीसीला पत्र लिहिले आहे. आम्ही विश्वचषक स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर काम करत आहोत. मात्र, सामन्यांच्या तारखा आणि वेळा बदलण्यात येणार आहे, परंतु मैदान तसेच राहील.”