‘‘अमित मिश्राची निवड विचारपूर्वक करण्यात आली आहे. मात्र दौऱ्यावरील वातावरणाचा अभ्यास करून अंतिम संघ हा कर्णधारच निवडेल. प्रग्यानच्या नावाचीही चर्चा झाली. परंतु संघात १५ खेळाडूंची निवड करताना मिश्राला प्राधान्य देण्यात आले,’’ अशी प्रतिक्रिया निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.
‘‘श्रीलंका दौऱ्यावर समतोल संघ पाठवण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे. कर्ण शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अद्याप दुखापतीतून सावरले नसल्यामुळे त्यांच्या नावांची चर्चा झाली नाही,’’ असे पाटील यांनी सांगितले.
‘‘महेंद्रसिंग धोनीला पर्याय मिळणे, इतके सोपे नाही. सध्या तरी यष्टीरक्षणासाठी वृद्धिमान साहा हा उत्तम पर्याय आहे. साहाची फलंदाजीची क्षमता पाहता तो मिळालेल्या संधीला न्याय देईल,’’ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
झिम्बाब्वे दौऱ्यावरील कामगिरीचीसुद्धा बैठकीत चर्चा झाली, असे पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘नेतृत्वात बदल झाल्यावर काही बदल दिसून येणे स्वाभाविक आहे. हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. धोनीने कसोटी कर्णधार म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे, विराटसुद्धा चांगले नेतृत्व करील, अशी आशा आहे. पुढे काय घडेल, हे सांगणे योग्य ठरणार नाही.’’
‘‘सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण जेव्हा निवृत्त झाले, तेव्हा त्यांची पोकळी भरू शकतील असे खेळाडू आपल्याला मिळणार नाहीत, असे वाटत होते. परंतु आपण चांगली फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला,’’ असे पाटील यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा