माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचा सल्ला
मुंबई : युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसारख्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये उत्तम कामगिरी करून संधीचे सोने करा, असा सल्ला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी उदयोन्मुख क्रिकेटपटूंना दिला आहे.
युवा विश्वचषकासाठी निवड झालेल्या दादर युनियन क्रिकेट क्लबच्या यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना या क्रिकेटपटूंचा गुरुवारी भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी वेंगसरकर आणि माजी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर उपस्थित होते.
‘‘कोणतेही दडपण बाळगू नका. विश्वचषकासारख्या स्पर्धा देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रेरणा देतात. यासाठी स्वत:च्या खेळात बदल करण्याऐवजी दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता असते. प्रत्येक वेळी एका सामन्याचा विचार करून पुढे गेल्यास तुम्ही लक्ष्य साधू शकता,’’ असा कानमंत्र रहाणेने दिला.