साठीपार’ वेंगसरकर
कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे लॉर्ड्सवर साकारलेले सलग तिसरे शतक. लॉर्ड्स म्हणजे क्रिकेटची पंढरी, म्हणूनच त्याचे अप्रूप वाटते. मी दरवर्षी लॉर्ड्सला जातो, तेव्हा त्या आठवणींनी शहारे येतात. लॉर्ड्सचा इतिहास आणि दर्दी क्रिकेटरसिकांनी भारलेले वातावरण हे प्रेरणादायी असते.
मुंबईचा संघ त्यावेळी नागपूरमध्ये शेष भारताविरुद्ध इराणी करंडक सामना खेळत होता. त्या सामन्यात बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना सारखे गाजलेले गोलंदाज समोर होते. मुंबईची सुरुवात खराब झाल्यानंतर एका १९ वर्षीय युवकाने हिमतीने डाव सावरला. तेव्हा आकाशवाणीवर समालोचन करणारे माजी क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांनी, ‘ हा युवक कर्नल सी. के. नायडू यांच्यासारखा खेळतो,’ अशी दाद दिली होती.. पुढे तर, प्रसारमाध्यमांनी ‘कर्नल’ हा शब्द दिलीप वेंगसरकर यांच्या नावासोबत कायमचाच जोडला. तुम्ही लष्करात कधी होता, असे काही जण आताही वेंगसरकर यांना कुतुहलाने विचारतात. भारताचे कर्णधारपद, गुणवत्ता जोपासना समिती, निवड समितीचे अध्यक्षपद असे कारकीर्दीतील अनेक महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता वेंगसरकर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षपद आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद सांभाळत आहेत. मुंबईच्या क्रिकेटने मला बरेच दिले आहे, आता त्याचे ऋण फेडण्यासाठीच मी धडपड करीत आहे, अशा भावना बुधवारी वयाची साठी पार करणाऱ्या वेंगसरकर यांनी प्रकट केल्या. ‘मी पुढल्या काळासाठी कोणतीही योजना आखलेली नाही. पण सारे मनासारखे घडत जाते. अर्थात, अखेरच्या श्वासापर्यंत क्रिकेट हाच माझा ध्यास असणार आहे,’ असे त्यांनी यावेळी सांगितले. आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यापाशी पोहोचणाऱ्या वेंगसरकर यांच्याशी यानिमित्ताने केलेली खास बातचीत-
*आयुष्याकडे मागे वळून पाहताना काय वाटते?
निवृत्त होऊन मला २५ वष्रे झाली, हे खरेच वाटत नाही. अनेक वष्रे मुंबईचे आणि भारताचे प्रतिनिधित्व केल्यामुळे क्रिकेटबद्दल मी समाधानी आहे. पण निवृत्तीनंतर खेळाची खेळाडूकडून जी योगदानाची अपेक्षा असते, ती खूपशी मी पूर्ण केली आहे, असे मला वाटते. १९९५मध्ये ओव्हल मैदानावर मी एल्फ क्रिकेट अकादमी सुरू केली. मग माहूल आणि चिंचवड येथेही अकादम्या सुरू केल्या. यातून अनेक गुणी क्रिकेटपटू मुंबईला आणि महाराष्ट्राला मिळाले आहेत. तसेच बऱ्याच खेळाडूंना नोकऱ्याही मिळाल्या. अनेकांना संधी आणि व्यासपीठ मिळवून दिल्याचे समाधान मला नक्की मिळते आहे. क्रिकेटनिमित्त देशविदेशात फिरताना अनेक मित्र मला मिळाले.
*जीवनाच्या प्रवासात अनेकांचे साहाय्य लाभते. दिलीप वेंगसरकर घडवण्याचे श्रेय कुणाला द्याल?
मला घडवण्यासाठी अनेकांचे मोलाचे श्रेय लाभले आहे. हे काही एखाद्याचे श्रेय नक्कीच नाही. संघ, प्रशिक्षक, सहयोगी, अकादमीतील प्रत्येक जण अशा अनेकांचा मी उल्लेख करीन. वासू परांजपे माझे पहिले कर्णधार, लहानपणापासून दिग्गज कसोटीपटूंशी खेळण्याची संधी देणारे दादर युनियन क्लब, किंग्ज जॉर्ज शाळा, पोदार महाविद्यालय, मुंबईचे सहकारी खेळाडू या सर्व मंडळींचे खूप योगदान आहे. आई-वडील आणि सर्वात महत्त्वाचे माझी पत्नी मनाली यांचे श्रेय नाकारताच येणार नाही. कारकीर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अनेक दौरे व्हायचे. त्यावेळी माझ्या पत्नीने कुटुंब आणि मुलांची जीवापाड काळजी घेत त्यांच्यावर संस्कार घडवले. त्या काळात क्रिकेटमध्ये पैसा नव्हता. त्यामुळे नोकरीसाठी बी. कॉम. होणे आवश्यक होते. महाविद्यालयात असताना चंदगडकर सर आणि अन्य शिक्षक दौऱ्यांच्या काळात राहिलेला अभ्यास करून घेण्यासाठी मेहनत घ्यायचे. वयाच्या विसाव्या वर्षी मी टाटामध्ये नोकरीला लागलो, तेथील ४० वष्रे आणि मुंबई क्रिकेटच्या प्रशासनातली दहा वष्रे अनेकांचे सहकार्य मिळाले.
*मुंबईच्या क्रिकेटने तुम्हाला काय दिले आहे?
मुंबईकडून खेळल्यामुळे मला खूप वाव आणि संधी मिळाल्या. शेवटच्या रणजी सामन्यातही मी मध्य प्रदेशविरुद्ध २८३ धावा केल्या होत्या. परंतु निवृत्तीबाबत मी आधीच ठरवले होते. निवृत्ती पत्करल्यानंतरही अनेक राज्यांकडून रणजी खेळण्याचे प्रस्ताव आले होते. पण फक्त मुंबईकडून इतकी वष्रे खेळल्यानंतर आणखी कुठे खेळायचे, विशेषत: मुंबईच्या विरुद्ध खेळायचे, हे माझ्या पचनीच पडले नाही. मुंबईच्या क्रिकेटने मला बरेच काही दिले. मुंबई क्रिकेटचा इतिहास हा कुणालाही हेवा वाटणारा असा आहे. या मुंबईचे इतकी वष्रे प्रतिनिधित्व करता आले, याचा मला सार्थ अभिमान आहे.
*कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण कोणता?
लॉर्ड्सवर साकारलेले सलग तिसरे शतक, हा ! लॉर्ड्स म्हणजे क्रिकेटची पंढरी, म्हणूनच त्याचे अप्रूप वाटते. मी दरवर्षी लॉर्ड्सला जातो, तेव्हा त्या आठवणींनी शहारे येतात. लॉर्ड्सचा इतिहास आणि दर्दी क्रिकेटरसिकांनी भारलेले वातावरण हे प्रेरणादायी असते. याचप्रमाणे काही मैदाने आपल्यासाठी यशदायी ठरतात, त्या मैदानांवर सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळेच मैदानाशी ऋणानुबंधाचे नाते निर्माण होते. त्यानंतर १९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रथमच जगज्जेतेपद जिंकले. मग १९८५मध्ये बेन्सन अँड हेजेस स्पर्धा जिंकली. १९८६मध्ये इंग्लंडमधील मालिकेत मालिकावीर झालो. याचप्रमाणे भारताचे नेतृत्व करणे, हे कारकीर्दीतील आणखी काही महत्त्वाचे क्षण ठरले. महाविद्यालयीन दिवसांत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना आम्ही कर्नाटकला गेलो होतो आणि परतताना म्हैसूर-दादर रेल्वे पकडली होती. परंतु आरक्षण वगैरे ही प्रथा तेव्हा नसल्यामुळे कुठल्याही डब्यात जागा मिळेल तिथे चढायचो. पण त्यावेळी इंजिनाच्या डब्यात एका बाजूला आम्ही उभ्याने प्रवास केला. पण कोळशाच्या त्या भट्टीतून प्रवास करीत जेव्हा दादरला आम्ही उतरलो, तेव्हा आम्हाला एकमेकांना ओळखणेही कठीण झाले होते.
*मार्शल, होल्डिंग आणि रॉबर्ट्सारखे आग ओकणारे गोलंदाज वेस्ट इंडिज संघात असताना तुम्ही सहा शतके झळकावली आहेत. याबाबत काय सांगाल?
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची त्यावेळी आग ओकणारे वगैरे अशी ख्याती होती. परंतु खेळताना एक गोलंदाज किंवा प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याकडे पाहायचो. त्यांच्याविरुद्ध धावा काढणे, हे स्वाभाविकच आव्हानात्मक होते. पण तुमची मेहनत, स्वत:चा निर्माण केलेला दर्जा हा अशा वेळी उपयुक्त होतो. त्यावेळी अनेक दिग्गज फलंदाज भारतीय संघात होते. त्यांच्या खेळाच्या तंत्राकडे पाहून बरेच काही शिकता यायचे. फिरोझशाह कोटला स्टेडियमवर मी विंडीजविरुद्ध तीन शतके झळकावली आहेत.
*रणजी जेतेपद १९९१मध्ये फक्त दोन धावांनी हुकले होते, त्या लढतीतील तुमची झुंज अजूनही आठवते?
अजूनही माझ्या डोळ्यांसमोर ते क्षण उभे राहतात आणि अंगावर काटा येतो. हरयाणाविरुद्धच्या अंतिम सामन्यात सचिनने ९६ धावांची अप्रतिम खेळी साकारली होती. मग मी सूत्रे हाती घेत दुखापतीची पर्वा न करता १३९ धावांची झुंजार खेळी साकारताना अगदी अखेरचा फलंदाज अॅबी कुरुविल्लासोबत किल्ला लढवला होता. पण कुरुविल्ला धावचीत झाला आणि सामना आमच्या हातून थोडक्यात निसटला. त्याचे शल्य मला आजही बोचते आहे. त्या सामन्यानंतर तीन महिने मला झोप लागली नव्हती. नंतर इंग्लंड दौऱ्यावर गेल्यावरसुद्धा तो सामना सारखा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहायचा.
क्रिकेटपटू म्हणून घडताना शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. जीवनात शिस्त ही खूप महत्त्वाची असते. अभ्यास व क्रिकेट सोडून कोणतेच उद्योग मी केले नाहीत.
* क्रिकेटपटू घडवताना तुम्ही कशा रीतीने पाहता?
गुणवत्ता हेरण्याचा गुण माझ्यात आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) संचालकपद माझ्याकडे देण्यात आले आहे. परंतु हे काम तसे माझ्यासाठी नवे नाही. देशातील क्रिकेटमधील गुणवत्ता विकसित करण्यासाठी २००२मध्ये टॅलेंट रिसोर्स डेव्हलपमेंट विंगची स्थापना झाली. त्यावेळी त्याचे अध्यक्षपद माझ्याकडे सोपवण्यात आले होते. त्यानंतर २००६मध्ये राष्ट्रीय निवड समितीचे पश्चिम विभागाचे सदस्यपद मिळेपर्यंत मी इमाने इतबारे हे कार्य केले. सध्या भारतीय संघाची जी गुणवत्ता दिसत आहे, त्यातील सर्व खेळाडूंना पैलू याच योजनेत पाडण्यात आले आहेत. गुणवत्ता शोधता आली पाहिजे आणि मग त्याला पैलू पाडता यायला हवे. एखादा गुणी खेळाडू मिळाल्यानंतर त्याच्या पाठीशी राहून त्याला घडवण्यासाठी मदत करणे हे खूप महत्त्वाचे असते.
*जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे?
शाळेत असताना अभ्यासातसुद्धा हुशार होतो. क्रिकेटपटू म्हणून घडतानासुद्धा शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. जीवनात शिस्त ही खूप महत्त्वाची असते. अभ्यास व क्रिकेट याव्यतिरिक्त बाकी कोणतेच उद्योग मी केले नाहीत. सामना असो किंवा नसो, रात्री दहा वाजता झोपायचे व सकाळी लवकर उठायचे. हा शिरस्ता आजही जोपासला आहे. मी नेहमी सकारात्मकपणे आयुष्याकडे पाहतो, त्यामुळे मिळालेल्या संधीचे कसे सोने करता येईल, हा माझा दृष्टिकोन असतो.
आरक्षण वगैरे ही प्रथा तेव्हा नसल्यामुळे कुठल्याही डब्यात जागा मिळेल तिथे चढायचो. पण त्यावेळी इंजिनाच्या डब्यात एका बाजूला आम्ही उभ्याने प्रवास केला. पण कोळशाच्या त्या भट्टीतून प्रवास करीत जेव्हा दादरला आम्ही उतरलो, तेव्हा आम्हाला एकमेकांना ओळखणेही कठीण झाले होते.