महिन्याभराच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीची रणधुमाळी आता ऐन रंगात आली आहे. सत्ताधारी बाळ म्हाडदळकर गट आणि ‘क्रिकेट फस्र्ट’ गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून, मागील निवडणूक न लढवणारे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यंदा म्हाडदळकर गटाकडून निवडणूक लढणार असल्याचे समजते. मात्र वेंगसरकर यांच्या म्हाडदळकर गटातील पुनरागमनामुळे सत्ताधारी गटातील पदाधिकाऱ्यांची पुनर्रचना होणार आहे.
वेंगसरकर यांनी एमसीएच्या उपाध्यक्षपदाच्या चार कार्यकाळांपैकी तीनदा म्हाडदळकर गटाकडून निवडणूक लढली होती. काही वर्षांपूर्वी क्रिकेटपटूंचे पॅनेल त्यांनी एमसीए रणांगणात उतरवले होते. मात्र आता ते म्हाडदळकर गटाकडून पुन्हा नशीब आजमावणार आहेत. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी म्हाडदळकर आणि ‘क्रिकेट फस्र्ट’ या दोन्ही गटांचा पाठिंबा असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार बिनविरोध निवडून येणार हे निश्चित मानले जात आहे. मागील निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी पवारांना आव्हान देण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु नंतर मुंडे यांना एमसीएच्या नियमावलीच्या बडग्यामुळे निवडणूक लढता आली नव्हती. त्यावेळी अ‍ॅड. आशीष शेलार यांनी म्हाडदळकर गटाकडून अर्ज केला होता, मात्र नंतर माघार घेतली होती.
मागील निवडणुकीत प्रचंड मतांनी उपाध्यक्षपदावर निवडून येणाऱ्या ‘क्रिकेट फस्र्ट’च्या डॉ. विजय पाटील यांची विजयी घोडदौड रोखणे अवघड आहे. मात्र दुसऱ्या जागेसाठी वेंगसरकर यांना निवडून आणणे म्हाडदळकर गटाला प्रतिष्ठेचे वाटल्यास स्वाभाविकपणे उपाध्यक्षपदासाठी दुसरा उमेदवार लढवणे ही जोखीम ठरणार आहे. या परिस्थितीत रवी सावंत उपाध्यक्षपदासाठी लढणार नाहीत. तथापि, शेलार यांचे नावे नेमक्या कोणत्या पदासाठी म्हाडदळकर गट निश्चित करेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
म्हाडदळकर गटाकडून अद्याप उमेदवारीचे चित्र स्पष्ट करण्यात आले नसले, तरी संयुक्त सचिवपदाच्या एका जागेसाठी डॉ. पी. व्ही. शेट्टी यांच्याशिवाय पर्याय नसेल. तथापि, रवी सावंत संयुक्त सचिव की कोषाध्यक्षपदासाठी लढणार हे मात्र लवकरच स्पष्ट होईल. या सर्व जागानिश्चितीमध्ये विद्यमान कोषाध्यक्ष विनोद देशपांडे आणि संयुक्त सचिव नितीन दलाल यांच्यापैकी एकाला कार्यकारिणी सदस्यपदासाठी लढावे लागण्याची दाट शक्यता आहे.
‘क्रिकेट फस्र्ट’ गटाकडून विजय पाटील यांच्यासह अ‍ॅबी कुरुविल्ला, नदीम मेमन, लालचंद रजपूत, मयांक खांडवाला, उमेश खानविलकर आणि संगम लाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यांच्यापैकी रजपूत संयुक्त सचिवपदासाठी तर खांडवाला कोषाध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तूर्तास, १७ जूनला होणाऱ्या एमसीएच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीची मुंबईच्या क्रिकेटवर्तुळात जोरदार चर्चा आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही पत्ते खुले होण्याची दाट शक्यता आहे.

Story img Loader