Vengsarkar on Virat Kohli: विराट कोहलीची गणना सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. सचिन तेंडुलकरनंतर विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आहेत. वन डेमध्ये तो सचिनचा शतकांचा विक्रम मागे टाकणार आहे. विराटने क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. २०११ मध्ये याच दिवशी विराटने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण २००८ मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याच वर्षी विराटच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता.
एम.एस. धोनीला विराट संघात नको होता
एम.एस. धोनीला विराट संघात नको होता हे तुम्हाला धक्कादायक वाटेल पण हे खरे आहे. महेंद्रसिंग धोनी विराट कोहलीचा टीम इंडियात समावेश करण्याच्या बाजूने नव्हता. त्यावेळी भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता असलेले दिलीप वेंगसरकर यांनी हा दावा केला होता. हा खुलासा करताना दिलीप वेंगसरकर म्हणाले होते की, “२००८च्या अंडर-१९ विश्वचषकात विराटच्या कामगिरीनंतर त्याला टीम इंडियामध्ये स्थान द्यायचे होते. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार होता. महेंद्रसिंग धोनी आणि बीसीसीआयचे तत्कालीन कोषाध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना तामिळनाडूचा फलंदाज एस. बद्रीनाथ संघात हवा होता.”
बद्रीनाथ हा सीएसकेचा खेळाडू होता
बीसीसीआयचे माजी निवड समिती अध्यक्ष वेंगसरकर पुढे म्हणाले, “मला माहित होते की एस. बद्रीनाथ चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू असल्याने त्यांना संघात ठेवायचे होते. कोहलीचा समावेश झाल्यावर बद्रीनाथला वगळावे लागले. एन. श्रीनिवासन त्यावेळी बीसीसीआयचे कोषाध्यक्ष होते. बद्रीनाथ आपला खेळाडू असल्याने त्याला संघातून वगळण्यात आल्याने ते नाराज होते.”
१९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेले दिलीप वेंगसरकर यांच्या मते, धोनी आणि गॅरी कर्स्टन देखील कोहलीच्या नावावर सहमत नव्हते. ते पुढे म्हणाले, “मला वाटले की कोहलीला संघात समाविष्ट करण्याची हीच योग्य वेळ आहे. इतर चार निवडकर्त्यांनी माझ्या निर्णयाचे समर्थन केले परंतु गॅरी कर्स्टन आणि एम.एस. धोनी यांनी विरोध केला कारण त्यांनी कोहलीला फारसे त्यांनी पाहिले नव्हते. मी त्याला सांगितले की मी त्याला खेळताना पाहिले आहे आणि आपण त्याला संघात घेतले पाहिजे.”
वेंगसरकर यांना आपले पद गमवावे लागले होते
दिलीप वेंगसरकर एका मुलाखतीत यानंतर म्हणाले की, “विराट कोहलीची निवड केल्यानंतर श्रीनिवासन यांनी मला बद्रीनाथला बाहेर ठेवण्याचे कारण विचारले. मी त्यांना सांगितले की विराटला मी खेळताना पाहिले आहे तो इतर खेळाडूंपेक्षा वेगळा आहे. पण ते म्हणाले, बद्रीनाथने तामिळनाडूसाठी ८०० धावा केल्या. त्यावर मी बद्रीनाथला संधी मिळेल असं म्हटलं होतं, पुढे श्रीनिवासन म्हणाले की संधी कधी मिळणार? तो २९ वर्षांचा आहे. दुसऱ्याच दिवशी एन. श्रीनिवासन कृष्णमाचारी श्रीकांत यांना शरद पवारांकडे घेऊन गेले. पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते आणि वेंगसरकरांच्या जागी श्रीकांतला मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले होते.”