सुब्रमण्यम बद्रीनाथला वगळून विराट कोहलीची भारतीय संघात निवड केल्यामुळे माझी निवड समितीप्रमुख पदावरुन गच्छंती करण्यात आल्याचा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी, दिलीप वेंगसरकर यांनी केला होता. मुंबईतील मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना वेंगसरकर यांनी एन. श्रीनीवासन यांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं होतं. मात्र श्रीनीवासन यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून, वेंगसरकरांच्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
“असा आरोप करण्यामागे वेंगसरकरांचा नेमका उद्देश काय आहे? त्यांनी जे काही आरोप केले आहेत त्यात जराही तथ्य नाही. कोणत्याही एका खेळाडूला न निवडल्यामुळे मी त्यांच्या गच्छंतीला कारणीभूत ठरलो असं म्हणणं चुकीचं आहे. मी बीसीसीआयमध्ये असताना निवड समितीच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केला नाही”, असं म्हणत श्रीनीवासन यांनी आपली बाजू मांडली आहे.
अवश्य वाचा – विराट कोहलीला निवडल्यामुळे झाली माझी गच्छन्ती – वेंगसरकरांचा गौप्यस्फोट
या सर्व गोष्टी आता बोलण्याने काय साध्य होणार आहे. मी एक खेळाडू म्हणून आतापर्यंत वेंगसरकर यांचा नेहमी आदर करत आलो आहे. माझ्यासाठी ते देशाचे नायक आहेत, पण ज्या प्रकारे त्यांनी आरोप केले आहेत ते पाहून मला खूप दुःख झाल्याचंही श्रीनीवासन म्हणाले. श्रीनीवासन यांनी केलेल्या आरोपांमध्ये ज्या दोन खेळाडूंचा उल्लेख आहे, त्या दोघांनीही २००८ साली श्रीलंका दौऱ्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे वेंगसरकरांच्या बोलण्याला कसलाही अर्थ नसल्याचं श्रीनीवासन म्हणाले.
वेंगसरकर हे निवड समितीचे प्रमुख असताना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते. यावेळी सर्वसाधारण सभेत हा मुद्दा समोर आला असताना त्यांनीच मुंबई क्रिकेटमध्ये काम करण्याला पसंती दर्शवली. त्यामुळे साहजिकच निवड समितीच्या प्रमुख पदासाठी त्यांचा विचार करण्यात आला नाही आणि श्रीकांत यांना प्रमुख म्हणून संधी देण्यात आली. त्यामुळे माझं नाव घेऊन वेंगसरकर आता नवीन समस्येला तोंड फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचंही श्रीनीवासन म्हणाले.