चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या काही दिवसांत सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी श्रीलंकेचा स्टार खेळाडू दिमुथ करूणारत्ने याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. करुणारत्नेने श्रीलंकेच्या संघ व्यवस्थापनाला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. अखेरचा सामना कधी खेळणार याबद्दल माहितीही त्याने श्रीलंकेला क्रिकेट बोर्डाला दिली आहे. श्रीलंकेसाठी दिमुथ करूणारत्नेने अनेक विक्रमी खेळी केली आहेत.
श्रीलंकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा दारूण पराभव केला. आता दुसरा कसोटी सामना येत्या ६ फेब्रुवारीपासून गाले येथे खेळवला जाणार आहे. हा सामना दिमुथ करूणारत्नेचा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. मात्र, पात्र न ठरल्यामुळे श्रीलंकेचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार नाही.
गाले कसोटी सामना दिमुथ करूणारत्नेचा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हा १००वा कसोटी सामना असणार आहे. यासह आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. दिमुथ करुणारत्नेने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे पराक्रम गाजवले आहेत.
करूणारत्नेने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ९९ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ३९.४० च्या सरासरीने ७१७२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १६ शतकं आणि ३९ अर्धशतकं केली आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी ५० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३१.३३ च्या सरासरीने आणि ७९.५६ च्या स्ट्राईक रेटने १३१६ धावा केल्या आहेत. दिमुथ करुणारत्नेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ एकच शतक झळकावले आहे.
त्याच्या नावावर ११ अर्धशतकं आहेत. फर्स्ट क्लासमधील त्याचा रेकॉर्ड खूपच आश्चर्यकारक आहेत. त्याने २१६ सामन्यांमध्ये ४४.९४ च्या सरासरीने १५७७७ धावा केल्या आहेत. त्याची निवृत्ती हा श्रीलंकन क्रिकेटसाठी मोठा धक्का आहे.