भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. नागपूरच्या स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी, लोकांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यासाठी त्याने ट्विटरवर हॅशटॅग आस्क डीके मोहीम सुरू केली. यामध्ये एका प्रश्नाने कार्तिकला चकित केले.
खरंतर सध्या जगभरात व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाला तो साजरा करायचा आहे. अशा स्थितीत ट्विटरवर आस्क डीकेवर एका चाहत्याने दिनेश कार्तिकला विचारले की, “सर मला या वर्षी व्हॅलेंटाईन डे कुणासोबत तरी साजरा करायला मदत करा” मान्य आहे, हा प्रश्न थोडा विचित्र होता. मात्र दिनेशने हे उत्तर देण्यास टाळाटाळ न करता असे उत्तर दिले की, तुम्हालाही हसू येईल.
या मजेशीर प्रश्नावर चाहत्यांना उत्तर देताना कार्तिकने एक जीआयएफ शेअर केले. ज्यामध्ये एक माणूस बोट दाखवत आरशात स्वत:ला पाहत आहे. यासह कार्तिकने त्याला स्पष्ट संकेत दिले की, माझ्याकडे मदत मागण्याऐवजी स्वत:हून विचार केला पाहिजे.
टी-२० विश्वचषक २०२२ पासून कार्तिक संघाबाहेर –
२०१९ च्या वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर, दिनेश कार्तिक भारतीय क्रिकेट संघाबाहेर होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी उत्कृष्ट हंगामासह तो पुन्हा एकदा आयपीएल २०२२ मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आला.
हेही वाचा – WPL 2023: महिला आयपीएल लिलावाबद्दल मोठी घोषणा; ४०९ खेळाडूंचा असणार समावेश, जाणून घ्या कोण, कोणत्या गटात?
त्याने स्वत:ला एक विश्वासार्ह फिनिशर म्हणून सिद्ध केले. त्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. जून २०२२पर्यंत टी-२० लाइनअपमध्ये आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर त्याला २०२२ च्या टी२० विश्वचषकातही खेळण्याची संधी मिळाली. पण तो काही विशेष करू शकला नाही आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.