कोलकता : एकीकडे निवड समिती ट्वेन्टी-२० विश्वचषक टेनिस स्पर्धेसाठी कुठलाही नवा प्रयोग करणार नाही असे संकेत देत असतानाच अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आपण ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा >>> IPL 2024: हैदराबादचा धावांचा महापूर पुन्हा एकदा सुफळ संपूर्ण, दिल्लीच्या फलंदाजांची झुंज अपयशी
‘आयपीएल’मध्ये सूर गवसल्याने दिनेशने पुन्हा एकदा भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पहायला सुरुवात केली आहे. विश्वचषक स्पर्धेला १ जून रोजी सुरुवात होईल, तेव्हा दिनेश ३९ वर्षांचा होईल. ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये झालेल्या अखेरच्या विश्वचषक स्पर्धेतही तो खेळला होता. भारतीय संघातील त्याचा तो अखेरचा सहभाग होता. तेव्हापासून तो क्रिकेट समालोचक म्हणून काम करत आहे. ‘आयपीएल’मध्ये नव्याने खेळण्याची संधी मिळाल्यावर मात्र, दिनेशचा पुनर्जन्म झाल्यासारखे दिसू लागले आहे. आतापर्यंत त्याच्या २२६ धावा झाल्या असून, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून कोहली (३६१), फॅफ डय़ुप्लेसिस (२३२) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
‘‘मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे की, मला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली, तर ती सर्वोत्तम घटना असेल. मी यासाठी खूप उत्सुक आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळणे यासारखी दुसरी मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात नसेल,’’ असे दिनेश कार्तिक म्हणाला. ‘‘सध्याच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना प्रथम तुम्ही तुमची ताकद लक्षात घ्यायला हवी, नंतर परिस्थितीनुसार कसे फटके खेळायचे हे समजायला हवे आणि सरावादरम्यान तशा परिस्थितीचा विचार करून सराव करण्याची गरज आहे. सर्वसाधारणपणे मी अशाच पद्धतीने सराव आणि फलंदाजी करतो. मी म्हणजे काही रसेल किंवा पोलार्ड नाही की ज्यांना प्रत्येक चेंडूवर षटकारच हवा असतो,’’असेही कार्तिकने सांगितले.