रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले. रोहित आणि पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या विजयासह गोड आरंभ केला. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने रोहितच्या नव्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकबझ लाइव्हमध्ये संवाद साधताना, कार्तिक म्हणाला, ”रोहित ही एक अशी व्यक्ती आहे जी त्याच्या तयारीबद्दल खूप काळजी घेते आणि नियोजनाला चांगल्या प्रकारे समजते.”
कार्तिक म्हणाला, ”मैदानाबाहेर रोहित शर्मा तयारीबाबत काळजी घेतो. तो खेळाचा चांगला विद्यार्थी आहे. तो त्याचा गृहपाठ करतो. संयोजन खूप चांगले समजून घेतो. तो त्याच्या विचारात तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. तरुणांमध्ये त्याच्याबद्दल खूप आदर आहे, ज्यामुळे तो चांगल्या स्थितीत आहे. लोकांचा नेता बनण्याची अप्रतिम कला त्याच्याकडे आहे. त्याच्यासारखे ज्येष्ठ खेळाडू आणि त्याच वेळी तरुणाई त्याच्याकडे आकर्षित होत आहे.”
हेही वाचा – वॉर्नरप्रमाणे दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावण्याचा प्रयत्न त्याला पडला महागात; व्हिडीओ झालाय व्हायरल
एखादी व्यक्ती वाईट काळात असताना त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवणे हा यशस्वी नेत्याचा गुण असतो. रोहितमध्ये हा गुण खूपच चांगला असल्याचे कार्तिकचे मत आहे. कार्तिक म्हणाला, ”रोहित शर्मा तांत्रिकदृष्ट्या खूप चांगला कर्णधार आहे. तो शांत असतो. त्याला फलंदाज आणि क्रिकेटपटूंबद्दल खूप सहानुभूती आहे कारण त्याने अनेक अपयश पाहिले आहे. तो तरुणपणी कसा होता, संघातील स्थान गमावले तेव्हाची वर्षे त्याला आठवतात. जेव्हा तो कर्णधार असतो तेव्हा त्याच्याकडे तरुणांसाठी भरपूर वेळ असतो. सहानुभूती हा एक अतिशय मजबूत शब्द आहे जो एखाद्या नेत्याला समजून घेणे आवश्यक आहे आणि रोहितकडे ही गुणवत्ता आहे.”
असा रंगला सामना…
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी अर्धशतके ठोकली. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले तर, रोहितने ४८ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात १० धावांची गरज असताना पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार मिळाला. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.