बंगळूरु :अनुभवी दिनेश कार्तिक विजयवीराची भूमिका चोख बजावत असल्यामुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने संघनिवड करताना भारताला अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत, असे मत भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारतीय संघात पुनरागमन करताना ३७ वर्षीय कार्तिकने दमदार कामगिरी केली. विशेषत: राजकोट येथे झालेल्या चौथ्या सामन्यात त्याने २७ चेंडूंत ५५ धावांची खेळी करत भारताला मालिकेत बरोबरी साधून दिली होती.

‘‘कार्तिकला विजयवीराच्या भूमिकेसाठी संघात स्थान दिले होते आणि त्याने आपली भूमिका चोख बजावल्याचे समाधान आहे. त्याच्या कामगिरीमुळे भविष्याच्या दृष्टीने संघनिवडीसाठी आम्हाला अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ‘आयपीएल’ क्रिकेटच्या गेल्या दोन-तीन हंगामांमध्ये कार्तिकने विजयवीराच्या भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याची भारतीय संघात पुन्हा निवड करण्यात आली. विशेषत: राजकोट येथील सामन्यातील कामगिरीने त्याने आपली भारतीय संघातील निवड सार्थ ठरवली,’’ असे द्रविड म्हणाला.

पंतची भूमिका महत्त्वाची

आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंतला फलंदाज आणि कर्णधार म्हणून फारशी छाप पाडता आली नाही. मात्र, द्रविडने त्याची पाठराखण केली आहे. ‘‘पुढील काही महिन्यांत भारतीय संघातील पंतची भूमिका महत्त्वाची असेल. केवळ दोन-तीन सामन्यांच्या आधारे खेळाडूबाबत मत बनवणे योग्य नाही,’’ असे द्रविड म्हणाला.

Story img Loader