मुंबई : दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० लीगचे (एसए२०) क्रिकेटविश्वातील वाढते महत्त्व दिनेश कार्तिकच्या सहभागाने अधोरेखित झाले आहे. कार्तिकच्या रूपात प्रथमच एखादा भारतीय क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळणार असून भविष्यात ही संख्या वाढत जाईल अशी आशा असल्याचे ‘एसए२०’ लीगचे संचालक आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ म्हणाले.
‘एसए२०’च्या तिसऱ्या हंगामाला ९ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्या निमित्ताने लीगचे संचालक स्मिथ, सदिच्छादूत मार्क बाऊचर, तसेच भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक यांनी प्रसारमाध्यमांशी विशेष संवाद साधला. कार्तिक या हंगामात पर्ल रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा संघ ‘आयपीएल’मधील राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या मालकीचा आहे.
हेही वाचा >>> कोन्सटासमध्ये प्रतिभेनुसार खेळण्याची क्षमता : पॉन्टिंग
‘‘आयपीएलचा स्तर गाठणे अवघड असल्याचे आम्ही जाणतो. मात्र, अन्य कोणत्याही लीगला आम्ही टक्कर देऊ शकतो. आमच्या लीगमधील सहाही संघ ‘आयपीएल’मधील फ्रँचायझींच्या मालकीचे आहेत. तसेच आम्हाला ‘बीसीसीआय’कडूनही पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे हंगामागणिक ‘एसए२०’ लीगचे महत्त्व वाढत चालले आहे आणि कार्तिकच्या सहभागाने ते अधोरेखित झाले आहे. प्रेक्षकसंख्या, प्रसारण हक्क करार आणि टीव्हीवर सामने पाहणाऱ्यांची संख्या या सर्व आकड्यांनुसार ‘एसए२०’ क्रिकेटविश्वातील दुसरी सर्वांत मोठी ट्वेन्टी-२० लीग ठरत आहे. आता हा प्रवास असाच सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे,’’ असे स्मिथ म्हणाले.
‘‘आमच्या लीगमध्ये भारतीय खेळाडूंचा सहभाग वाढेल अशी मला आशा आहे. ‘एसए२०’ लीगमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंनी खेळावे हीच आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. भारतीय खेळाडूंचा दर्जा सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे ते या स्पर्धेत खेळू शकले तर आमच्यासाठी ती मोठी गोष्ट असेल,’’ असेही स्मिथ यांनी नमूद केले.
‘आयपीएल’मधून निवृत्ती स्वीकारली असली, तरी मला क्रिकेट खेळत राहायचे होते. याआधी मी अन्य कोणत्याही लीगमध्ये खेळलेलो नाही. त्यामुळे पर्याय कोणते असू शकतात याबाबत विविध खेळाडूंशी चर्चा केली. अनेकांनी मला ‘एसए२०’चे नाव सुचवले. या लीगमधील पर्ल रॉयल्स संघाने माझ्यासमोर करार ठेवला आणि मी तो त्वरित स्वीकारला. – दिनेश कार्तिक, भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज.