India vs New Zealand 1st Test: भारत आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि संपूर्ण संघ ३१.२ षटकांत अवघ्या ४६ धावांत सर्वबाद झाला. संघासाठी केवळ दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. बेंगळुरूमधील भारतीय संघाची फलंदाजी पाहून सर्वच चकित झाले. देशातील काही माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरवर जोरदार टीका करत आहेत. बंगळुरू कसोटीसाठी त्यांची रणनिती योग्य नव्हती असे त्याचे मत आहे.
पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. मात्र, तो विशेष काही करू शकला नाही आणि खाते न उघडताच बाद झाला. यानंतर माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया समोर आली आहे. गौतम गंभीरच्या निर्णयावर भाष्य करताना दिनेश कार्तिक नेमकं काय म्हणाला.
क्रिकबझशी चर्चा करताना कार्तिक म्हणाला, “मी विराट कोहलीची बाजू घेत नाही. पण त्याच्याकडे महान फलंदाजांसारखे गुण आणि तंत्र आहे. जर मी संघात बदल केले तर फलंदाजाला त्याच क्रमांकावर फलंदाजीला पाठवेन जिथे तो चांगली कामगिरी करू शकतो. विराट कोहली वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो, टी-२० मध्ये तो सलामीला उतरतो. चेंडू हा प्रत्येक फॉरमॅटनुसार वेगळा आहे. पण कसोटीमध्ये विराट कोहलीसाठी सर्वात्तम स्थान कोणते असेल तर चौथ्या क्रमांकावर आहे.”
गंभीरने केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर उतरवायला हवे होते, असे दिनेश कार्तिकचे मत आहे. तो म्हणाला, “खरंतर विराट कोहलीचंही कौतुक केलं पाहिजे. विराट कोहली असं म्हणू शकला असता की, मला तिसऱ्या क्रमांकावर नव्हे तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. तुम्ही केएल राहुल किंवा सर्फराज खान यापैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणं शक्य होतं. पण विराटने सांगितलं की मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे.”
दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, “मला अजूनही असं वाटतं की केएल राहुलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी होती. हे माझे स्वतःचे मत आहे. मी गंभीरच्या या विचाराशी सहमत नाही की आपण समान फलंदाजीचा क्रम ठेवला पाहिजे जेणेकरून त्यांच्या विचार प्रक्रियेत सातत्य राहील आणि शेवटी निकाल समोर येतील.”