भारतीय फलंदाज दिनेश कार्तिक गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर त्याने प्रदीर्घ काळानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला संघात घेण्यात आले आहे. आज (१२ जून) टी ट्वेंटी मालिकेतील दुसरा सामना ओडिशातील कटक येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल एक वक्तव्य केले आहे. “जर मला एखाद्या व्यक्तीच्या मनात डोकावण्याची क्षमता मिळाली तर मी एमएस धोनीचे मन वाचेल,” असे कार्तिक म्हणाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दिनेश कार्तिकला त्याच्या आवडीनिवडींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. जर त्याच्याकडे एखाद्या व्यक्तीचे मन वाचण्याची क्षमता असेल तर तो कोणाचे मन वाचेल? या प्रश्नाच्या उत्तरात कार्तिक म्हणाला, “जर माझ्याकडे एखाद्या व्यक्तीचे मन वाचण्याची क्षमता असेल तर मी नक्कीच एमएस धोनीचे मन वाचेन.” भारताचा माजी कर्णधार असलेला एमएस धोनी त्याच्या तल्लख बुद्धीसाठी आणि उत्कृष्ट रणनीतीसाठी ओळखला जातो. धोनीच्या मनात काय सुरू आहे, याचा अंदाज लावणे सर्वात कठीण काम आहे, असे म्हटले जाते.
या प्रश्नोत्तराच्या खेळादरम्यान कार्तिकला इतरही अनेक प्रश्न विचारण्यात आले. तुला संघासोबत रात्री जेवण करायला आवडेल की सिनेमा बघायला आवडेल? या प्रश्नावर त्याने जेवणाची निवड केली. चहा किंवा कॉफीपैकी काय आवडेल? या प्रश्नामध्ये त्याने चहाची निवड केली. त्यानंतर, कार्तिकला जेव्हा डान्सशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर फार कठीण असल्याचे सांगितले. समुद्र किनारा आणि पर्वतीय प्रदेशांपैकी एकाची निवड करण्यास सांगितल्यानंतर त्याने पर्वतांची निवड केली. अशा ठिकाणी जाऊन आपल्याला शांती मिळते, असे तो म्हणाला.