आगामी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्याकरिता झालेल्या चाचणीत पक्षपाती निर्णय घेण्यात आले असा आरोप अर्जुन पुरस्कार विजेत्या दिनेशकुमार याच्यासह तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी केला आहे. त्यांनी न्यायालयात जाण्याचीही धमकी दिली आहे.
दिनेशकुमार (९१ किलो), दिलबागसिंग (६९ किलो) व प्रवीणकुमार (९१ किलोवरील) यांनी निवड समितीवर आरोप करताना सांगितले, आमची कामगिरी चांगली होऊनही भारतीय संघाचे प्रशिक्षक व निवड समिती सदस्यांनी आपल्याला हेतूपूर्वक वगळले आहे.
या तीन खेळाडूंना मागे टाकीत आशियाई क्रीडा स्पर्धा रौप्यपदक विजेता मनप्रीतसिंग (९१ किलो), आशियाई रौप्यपदक विजेता मनदीप जांगरा व विद्यमान राष्ट्रीय विजेता सतीशकुमार (९१ किलोवरील) यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले. ही स्पर्धा कझाकिस्तानमध्ये ११ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. निवड समितीत मेहताबसिंग व पदमबहादूर माल यांच्याबरोबरच भारतीय बॉक्सिंग महासंघाचे सचिव राजेश भंडारी यांचा समावेश होता.
भारतीय संघ निवडीबाबत २००९ पासून माझ्यावर अन्याय केला जात आहे. पक्षपातीपणा करण्यात माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अखिलकुमार याचा हात आहे असा आरोप दिलबागसिंग याने केला.
या आरोपाचे अखिलकुमारने लगेचच खंडन केले आहे. त्याने दिलबागविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले.
भंडारी यांनी निवड चाचणीत पक्षपातीपणा झाल्याचा आरोप फेटाळत सांगितले, हे आरोप अतिशय दुर्दैवाचे व पोरकटपणाचे आहेत. सर्वासमोर चाचणी लढती आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामुळे चाचणीतील विजयी खेळाडूंनाच संधी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा