रघुनंदन गोखले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत पहिल्या सहा डावांनंतरच्या विश्रांतीच्या दिवशी जगज्जेता डिंग लिरेन आणि आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यात जरी ३-३ अशी गुणांची बरोबरी दिसत असली तरी, यामध्ये एकही डाव ज्याला रटाळ म्हणता येईल असा झालेला नाही. जवळपास सर्वच डाव उत्कंठावर्धक झाले असून बहुतेकांमध्ये डिंगचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, या सर्व रोमहर्षक लढती मनोरंजक करण्यामध्ये १८ वर्षीय गुकेशच्या तारुण्यसुलभ धोका पत्करण्याच्या शैलीचा हात आहे हे विसरता येणार नाही.

पाचवा डाव याचे उत्तम उदाहरण आहे. डिंगच्या फ्रेंच बचावाविरुद्ध गुकेश काही तरी आक्रमक पद्धत शोधून काढेल असा जाणकारांचा कयास होता. मात्र, गुकेशने सर्वांत कंटाळवाणी समजली जाणारी एक्सचेंज पद्धत निवडून सर्वांचा अंदाज चुकवला. कारण ही पद्धत उच्च दर्जाच्या खेळाडूंना बरोबरीशिवाय काहीही देत नाही असा आतापर्यंतचा अनुभव आहे. तरीही प्रवाहाविरुद्ध जाऊन गुकेशने सुरुवातीला वजिरावजिरी झालेली असतानाही धोका पत्करून डावात चैतन्य आणायचा प्रयत्न केला आणि तो सपशेल अपयशी ठरणार होता; पण डिंगने सर्वोत्तम खेळी केल्या नाहीत आणि डाव बरोबरीत सुटला.

सहाव्या डावातही तसेच झाले. लंडन शहराच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या सुरुवातीच्या प्रकारात डिंगने पटापट चाली रचून गुकेशवर मानसिक दडपण आणायचा प्रयत्न केला. गॅरी कास्पारोव्हने विश्वनाथन आनंदविरुद्ध न्यूयॉर्कमधील जगज्जेतेपदाच्या लढतीत १९९५ साली हेच प्रयत्न केले होते. आनंदच्या अकादमीचा विद्यार्थी असणारा गुकेश जराही डगमगला नाही आणि शांतपणे विचार करून त्याने डिंगला वरचष्मा मिळू दिला नाही. विसाव्या चालीसाठी तब्बल ४२ मिनिटे विचार केल्यानंतर डिंगला जाणवले की आपल्याकडे किंचितसा फायदा आहे, पण धोका पत्करून खेळण्याइतपत नक्कीच नाही. त्याने २३ खेळ्या केल्यावर बरोबरीची तयारी दाखवली. मात्र, गुकेश तयार नव्हता. त्याने धोका पत्करून विजयाचा निकराने प्रयत्न केला, पण डिंग चुका करत नाही म्हटल्यावर ४२ चालींनंतर त्याला बरोबरी मान्य करावी लागली.

शैलीतील फरक…

एखाद्या जगज्जेत्याच्या दिमाखात नाही, पण प्रतिस्पर्ध्यावर दबाव ठेवून खेळणे डिंगकडून अपेक्षित होते. याउलट अननुभवी गुकेश बचाव करत डिंग चूक करेल अशा आशेवर खेळेल असे वाटत होते. मात्र, झाले उलटेच! पहिल्याच डावात अतिआक्रमक पवित्रा घेऊन गुकेशने आपले मनसुबे जाहीर केले. जरी तो हरला असला तरी त्यानंतरही डावात चैतन्य आणायचे काम तोच करतो आहे. जगज्जेता डिंग जरी घोडचुका टाळत असला तरी आक्रमणाचा तो जराही प्रयत्न करत नाही. लागोपाठ दोन वर्षे नेदरलँड्समधील टाटा स्टील स्पर्धेत गुकेशला हरवणारा डिंग हाच आहे का, असा प्रश्न पडावा असे डिंगचा निरुत्साही खेळ बघितल्यावर वाटते. मात्र, या दोघांच्या भिन्न शैलीमुळेच ही लढत उत्कंठा वाढवणारी ठरते आहे, हे निश्चित.

(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)