ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट
रिओ दी जानेरो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक चाचणी आणि अंतिम पात्रता स्पध्रेत भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने अप्रतिम कामगिरी करत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. हा पराक्रम करणारी दीपा ही पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली आहे. रिओ दी जानेरो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत महिला आर्टिस्टिक प्रकारात तिने नववे स्थान पटकावले. तिने एकूण ५२.६९८ गुणांची कमाई केली. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
‘५२.६९८ गुणांची कमाई केल्यानंतर दीपाला ऑलिम्पिक पात्रता मिळेल याची खात्री होती. अजून तीन सबडिव्हिजन बाकी होते, परंतु तिने तीन देशांच्या जिम्नॅस्टीना आधीच पराभूत केले होते. त्यामुळे ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली,’ अशी माहिती आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी दीपक काग्रा यांनी वृत्तसंस्थेला दिली. ते पुढे म्हणाले, ‘या स्पध्रेत ३३ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता आणि तिला तीन देशांच्या खेळाडूंपेक्षा अधिक गुणांची कमाई करायची होती. त्यात ती यशस्वी ठरली.’’
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दीपा रिओवारी पक्की करू शकली नाही.
२०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दीपाने कांस्यपदक पटकावले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली होती.
युवकांसाठी प्रेरणादायक कामगिरी -तेंडुलकर
नवी दिल्ली : रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची प्रवेशिका निश्चित करीत दीपा कर्माकरने भारताच्या युवा पिढीपुढे आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दांत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने दीपाचे अभिनंदन केले.
ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची संधी मिळविणारी दीपा ही पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे. सचिनने तिला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. सचिनप्रमाणेच केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनवाल यांनीही दीपाचे अभिनंदन करीत तिला ऑलिम्पिकसाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे जाहीर केले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) दीपाला ‘लक्ष्य ऑलिम्पिक पदक’ या योजनेमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे दीपा हिला ऑलिम्पिक तयारीसाठी सरावाची संधी मिळू शकेल.
क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण तसेच माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनीही दीपाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
५२ ऑलिम्पिकवारी निश्चित करणाऱ्या पहिल्या महिला जिम्नॅस्टबरोबर दीपाने ५२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारतीय जिम्नॅस्टला प्रवेश मिळवून दिला आहे.
११ पुरुष जिम्नॅस्टने आत्तापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. १९५२ (२ जिम्नॅस्ट), १९५६ (३) आणि १९६४ (६) या तीन ऑलिम्पिकसाठी भारताचे जिम्नॅस्ट पात्र ठरले होते.