Deependra Singh Airee Breaks Yuvraj Singh’s Record: नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी याने भारताचा माजी दिग्गज युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढत आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. दीपेंद्रने आशियाई खेळ २०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि १० चेंडूत ५२* धावा केल्या. दीपेंद्रच्या या खेळीनंतर क्रिकेटविश्वात चर्चा रंगल्या. चला जाणून घेऊया कोण आहे दीपेंद्र आणि तो आतापर्यंत किती क्रिकेट खेळला आहे.
दीपेंद्र सिंगने विक्रमात भर टाकत एका डावात सर्वाधिक स्ट्राईक रेटही नोंदवला. ५२०.०० च्या आश्चर्यकारक स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना त्याने १० चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी खेळली. यामध्ये आठ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे नेपाळ क्रिकेट संघाने आशियाई खेळांच्या टी-२० मध्ये मंगोलियाविरुद्ध केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची क्रिकेटच्या इतिहासात नोंद झाली आहे.
दीपेंद्र सिंग ऐरी हा २३ वर्षीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म २४ जानेवारी २००० रोजी झाला होता. तो संघात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो. त्याने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी केनियाविरुद्धच्या वरिष्ठ संघातून पदार्पण केले होते. पण नेपाळला २०१८ मध्ये वनडे खेळण्याचा दर्जा मिळाल्यानंतर तो मुख्य संघाचा भाग बनला. वरिष्ठ संघात पदार्पण करण्यापूर्वी दीपेंद्रने २०१६ मध्ये अंडर-१९ विश्वचषक खेळला होता.
दीपेंद्र नेहमीच पॉवर हिटिंगसाठी ओळखला जातो. केवळ फलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षणातही तो चपळ आहे. पॉवर प्लेमध्ये ३० यार्ड सर्कलच्या आत किंवा शेवटच्या ओव्हरमध्ये सीमेजवळ, दीपेंद्र सर्वत्र क्षेत्ररक्षण करताना खूप सक्रिय दिसतो. उत्कृष्ट फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही तो संघासाठी महत्त्वाचे योगदान देतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव –
दीपेंद्र नेपाळकडून एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये खेळतो. तो संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. दीपेंद्रने आतापर्यंत ५२ एकदिवसीय आणि ४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांच्या ५१ डावात ८८९ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा – Cricket World Cup: पाऊस जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास हिरावतो
याशिवाय, दीपेंद्रने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ४० डावांमध्ये ३७.२५ च्या सरासरीने आणि १३६.८४ च्या स्ट्राइक रेटने ११५५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजी करताना त्याने एकदिवसीय सामन्यात ३६ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २२ विकेट्स घेतल्या आहेत.