Dipika Pallikal and Harinder Pal win gold for India in mixed doubles squash: चीनमधील हाँगझोऊ येथे १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला बाराव्या दिवशी आणखी एक सुवर्णपदक मिळाले आहे. मिश्र दुहेरी स्क्वॉश स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी हे पदक जिंकले आहे. या स्पर्धेत भारताकडून दीपिका पल्लीकल कार्तिक आणि हरिंदर पाल सिंग संधू यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. या जोडीने अंतिम फेरीत मलेशियाच्या जोडीला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.
दीपिका आणि हरिंदर या जोडीला मलेशियाच्या बिंती अजमा आणि मोहम्मद सफिक यांच्याकडून कडवे आव्हान मिळाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारतीय जोडीने पहिला सेट ११-१० असा जिंकला. यानंतर दीपिका आणि हरिंदर दुसऱ्या सेटमध्ये ९-३ ने पुढे होते, परंतु मलेशियाच्या जोडीने बॅक टू बॅक पॉइंट घेत गुणसंख्या बरोबरी केली. येथून हरिंदरने दोन गुण मिळवले आणि दुसरा सेट ११-१० असा जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
तिरंदाजीच्या महिलांच्या कंपाउंड स्पर्धेत भारताला सुवर्णपदक –
तत्पूर्वी बाराव्या दिवसाच्या सुरुवातील तिरंदाजीच्या महिलांच्या कंपाउंड स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळाले . महिलांच्या कंपाउंड तिरंदाजी स्पर्धेत ज्योती, अदिती स्वामी आणि प्रनीत कौर यांनी सुवर्णपदक पटकावले. या त्रिकुटाने अंतिम फेरीत चायनीज तैपेई संघाचा २३०-२२९ असा पराभव केला. याआधी ज्योती, अदिती आणि प्रनीत यांनी उपांत्य फेरीत इंडोनेशियन संघाचा पराभव केला. त्यांनी उपांत्य फेरीत २३३-२१९ अशा फरकाने विजय मिळवला. त्याच वेळी, उपांत्यपूर्व फेरीत या त्रिकुटाने हाँगकाँगचा २३१-२२० असा पराभव केला होता.
हेही वाचा – ‘World Cup 2023’ला आजपासून सुरुवात, Google ने बनवले खास डूडल… एकदा बघाच
प्रणॉयने गाठली उपांत्य फेरी –
बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताचा एच.एस. मलेशियाच्या ली जी जियाचा सरळ गेममध्ये पराभव केला. त्याचबरोबर प्रणॉयने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. त्याने २१-१६, २१-२३, २२-२० अशा फरकाने सामना जिंकला.
आतापर्यंत १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली आहेत?
सुवर्ण: २०
रौप्य: ३१
कांस्य: ३२
एकूण: ८३