क्रीडा क्षेत्रात देश म्हणून ठसा उमटवण्यासाठी खेळातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन होण्याची आवश्यकता असल्याचे मत भारताची अव्वल स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकलने व्यक्त केले. क्रीडा संघटनांमध्ये क्रीडापटूंचा समावेश होणे गरजेचे आहे. खेळाडूंची भूमिका काय आहे हे माजी क्रीडापटूच जाणू शकतात. सरकारतर्फे मिळणारा निधी सहजपणे खेळाडूंपर्यंत यायला हवा, असे तिने पुढे सांगितले.
जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावणाऱ्या दीपिकाला स्क्वॉश ऑलिम्पिकचा भाग नसल्याची खंत आहे. मात्र २०२० पर्यंत स्क्वॉश या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा भाग होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. जिंकण्याइतकेच ऑलिम्पिकचा भाग होणेही गौरवशाली असल्याचे तिने पुढे सांगितले. कोलकातातील एका कार्यक्रमात अव्वल नेमबाज हिना सिद्धू, ऑलिम्पिक विजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम, दीपिका आणि पॅरालिम्पिक उंच उडीपटू एच. एन. गिरीश यांना गौरवण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धासाठी तंदुरुस्ती मिळविण्याकरिता मला आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने सांगितले.
दक्षिण कोरियात १३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेतून मेरी कोमने स्नायूंच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. या माघारीमुळे या स्पर्धेत सहाव्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या संधीवर पाणी सोडावे लागले आहे.
मेरी कोम म्हणाली, स्पर्धेकरिता मी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. दुखापत असताना तेथे जायचे व रिकाम्या हाताने परत यायचे हे माझ्या मनाला पटत नाही. माझी दुखापत बरी होण्यास थोडा वेळ लागत आहे. माझ्याऐवजी प्रतिनिधित्व करणारी पिंकी राणी हिला या स्पर्धेत पदक मिळेल, अशी मला खात्री आहे. रिओ ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी मी माझ्या तंदुरुस्तीबाबत काळजी घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा