अटक करण्यात आलेल्या क्रिकेटपटूंवर फौजदारी तक्रार भरला जाऊ शकतो, असे संकेत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी दिले आहेत. ‘‘परवानगी मिळाल्यास आम्ही या क्रिकेटपटूंवर फौजदारी तक्रार दाखल करू,’’ असे त्यांनी सांगितले.
‘‘स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी आयपीएलमधील खेळाडूंना अटक झाल्यामुळे खेळाची प्रतीमा काळवंडली आहे. त्यामुळे मी सर्वात जास्त दुखावलो आहे. कोणतीही शिक्षा दोषी खेळाडूंसाठी छोटी ठरेल,’’ असे मत श्रीनिवासन यांनी प्रकट केले आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘‘आयपीएलने क्रिकेटप्रेमींना निराश केलेले नाही. खराब क्रिकेटपटूंनी लोकांना निराश केले आहे. अशा घटना घडतात, तेव्हा आम्हालाही खूप वाईट वाटते.’’
श्रीनिवासन म्हणाले की, ‘‘आपण अतिशय व्यापकतेने विचार करीत आहोत. आपण सर्वप्रथम मान्य करायले हवे की, तीन खेळाडूंना अटक झाली आहे. त्यांचे वकील म्हणत आहेत की, ते प्रामाणिक आहेत. आपण दिल्ली पोलीस आपले आरोप कशा प्रकारे ठोसपणे सिद्ध करतात, याची प्रतीक्षा करायला हवी.’’
‘‘मी या प्रकरणाचा इन्कार करीत नाही. पोलिसांकडे काही पुरावे आहेत. त्याआधारेच ते पावले उचलत आहेत. माझे फक्त इतकेच म्हणणे आहे की, जोवर खेळाडू दोषी ठरत नाहीत, तोवर ते निर्दोष आहेत,’’ असे श्रीनिवासन यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘बीसीसीआयने या खेळाडूंवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परंतु हे धक्कादायक आहे. श्रीशांतसारखा कसोटीपटू आणि अन्य खेळाडू अशा कृतकृत्यासाठी आरोपी होतील, असे मला वाटले नव्हते.’’

Story img Loader