तुम्हाला खेळाडू म्हणून यशस्वी कारकीर्द घडवायची असेल, तर त्यासाठी खेळात शिस्त, समर्पण आणि योग्य प्रशासन असायला हवे. जो खेळाडू स्वत:मधील गुणवत्ता ओळखून त्यानुसार खेळ करतो तोच यशस्वी ठरतो, यावर भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांचे एकमत झाले.
‘‘तब्बल २७ वर्षे भारतामध्ये पेस अकादमी सुरू ठेवणे, ही एक अद्भुत अशीच गोष्ट आहे. यांसारख्या गोष्टी फार कमी पाहायला मिळतात. या अकादमीमधून बरेच वेगवान गोलंदाज भारताला मिळाले आणि या गोलंदाजांनी भारताचे नाव उंचावले. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिली आणि आता मॅकग्रा उत्तम पद्धतीने काम करत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये भारताला बरेच वेगवान गोलंदाज मिळतील,’’ अशी आशा सचिनने व्यक्त केली. या अकादमीमधून भारताला विवेक राझदान, जवागल श्रीनाथपासून वरुण आरोनपर्यंत बरेच वेगवान गोलंदाज मिळाले आहेत. बीसीसीआयनेही काही वर्षांपूर्वी या अकादमीच्या कामाची स्तुती करत त्यांना मान्यता दिली असून जगभरातील बरेच गोलंदाज येथे सराव करण्यासाठी येत आहेत.
‘‘भारतामध्ये वातावरण आणि खेळपट्टय़ा या वेगवान गोलंदाजीला पोषक नसल्या तरी बरेच युवा गोलंदाज पुढे येत आहेत. या अकादमीमध्ये गोलंदाजांना पैलू पाडले जातात, त्याचबरोबर त्यांना सर्वतोपरी सुविधाही दिली जाते,’’ असे मॅकग्रा म्हणाला. तो पुढे म्हणाला की, ‘‘सचिन हा सार्वकालीन सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याला गोलंदाजी करताना खेळाचा आनंद मिळायचा. २००४ साली सिडनी येथील कसोटीमध्ये त्याने सामन्यात एकही ‘कव्हर ड्राइव्ह’ न मारता पहिल्या डावात २४० धावा केल्या होत्या, यामधूनच त्याची महानता कळते. ’’
‘‘खेळाडूंनी स्वत:चा खेळ समजून घ्यायला हवा. त्यासाठी अभ्यासूवृत्ती हवी. वाईट गोष्टींकडे किंवा वाईट उदाहरणांकडे बघण्यात वेळ वाया घालवू नका. तुम्ही सराव कसे करता आणि ते खेळात कसे उतरवता, हे महत्त्वाचे आहे,’’ असे सचिन म्हणाला.
..त्या वेळी सचिन बाद होता
१९९९ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅडलेड कसोटीमध्ये मॅकग्राने टाकलेला उसळता चेंडू सोडण्यासाठी सचिन वाकला, तेव्हा चेंडू त्याच्या खांद्याला लागला आणि पंचांनी बाद दिले. याबाबत मॅकग्रा म्हणाला की, ‘‘कोणताही चेंडू यष्टय़ांवर आदळत असेल आणि त्यामध्ये तुमचा शरीराचा कोणताही भाग लागला, तर त्याला बाद द्यायला हवे. या निर्णयाने त्या वेळी बराच गदारोळ माजला होता, पण सचिन त्या वेळी बादच होता.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा