‘काहीवेळेला मला खुप निराश वाटते. काही सामनाधिकारी आणि परीक्षक मला कधीही पाठिंबा देत नाहीत. पण हरकत नाही. पूर्वाचल राज्याची मी प्रतिनिधी आहे, ही समस्या नाही. मी भारतीय आहे हे महत्त्वाचे आहे’, असे उद्वेगजनक उद्गार बॉक्सिंगपटू मेरी कोमने काढले. एडेलवाइज आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित कार्यक्रमात मेरी बोलत होती. या कार्यक्रमाला माजी हॉकीपटू वीरेन रस्क्विन्हा, गीत सेठी आणि युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू उपस्थित होते. निवड समिती प्रांतवाद जोपासते हे सांगताना मेरीला अश्रू आवरले नाहीत.

मेरीच्या वजनी गटातून हरयाणाची पिंकी जांगरा सहभागी होते. विविध स्पर्धामध्ये मी पिंकीवर विजय मिळवला आहे. मात्र तरीही परीक्षकांची साथ पिंकीलाच मिळते असा आरोपही मेरीने केला. निवडीच्या वेळी खुप वाद होतात. पिंकीला मी सर्वप्रकारच्या स्पर्धामध्ये नमवत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. मात्र निवडसमितीचा तिलाच पाठिंबा मिळतो. मात्र या सगळ्याचा कामगिरीवर परिणाम होऊ दिलेला नाही. बॉक्सिंग रिंगमध्ये मी स्वत:ला सिद्ध करेन असे मेरीने सांगितले.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरीला गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या संघातून वगळण्यात आले होते. मेरीऐवजी पिंकीला संधी देण्यात आली होती. राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी झालेल्या लढतीने पिंकीने मेरीवर मात केली होती मात्र या लढतीत चुकीच्या पद्धतीने परीक्षण झाल्याचा आरोप मेरीने केला.

Story img Loader