डेव्हिस चषकाच्या संयोजनाच्या मुद्दय़ावरून भारतीय टेनिसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. डेव्हिस चषकाच्या संयोजनासंदर्भात आमच्या रास्त मागण्यांचा विचार करा, अन्यथा डेव्हिस चषकावर बहिष्कार टाकू, असा इशारा टेनिसपटूंनी आयटाला (अखिल भारतीय टेनिस संघटना) दिला आहे.
यासंदर्भात आठ टेनिसपटूंनी एकत्रितपणे निवेदन जारी केले आहे. व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणे हा आमचा हेतू नाही, परंतु आमच्या कायदेशीर सूचनांचा विचार व्हावा, अशी आमची भूमिका आहे. डेव्हिस चषक संयोजनासंदर्भात सुधारणा व्हावी एवढेच आम्हाला वाटते, असे या खेळाडूंनी स्पष्ट केले.
सपोर्ट स्टाफमध्ये बदल, सामन्याच्या स्थळनिवडीच्या प्रक्रियेत सहभाग आणि डेव्हिस चषकाच्या मानधन व्यवस्थेत बदल या खेळाडूंच्या मागण्या आहेत. या मागण्यांबाबत आयटाने संवाद न साधल्यास डेव्हिस चषकावर बहिष्कार टाकू, असा स्पष्ट इशारा टेनिसपटूंनी दिला आहे.
फेब्रुवारीत दक्षिण कोरियाविरुद्ध होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीपूर्वी खेळाडूंसाठी आम्ही आचारसंहिता जाहीर करू, असे निवेदन आयटाचे महासचिव भरत ओझा यांनी प्रसिद्ध केले होते. या आचारसंहितेवर स्वाक्षरी करणाऱ्या खेळाडूंनाच डेव्हिस चषकात सहभागी होता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. या निवेदनाच्या पाश्र्वभूमीवर टेनिसपटूंनी बंडाचा झेंडा उगारला आहे. आमच्या मागण्या हा निर्वाणीचा इशारा नाही, भारतीय टेनिसची स्थिती सुधारावी एवढीच आमची अपेक्षा असल्याचे या टेनिसपटूंनी सांगितले. एकत्रित आलेल्या या खेळाडूंमध्ये सोमदेव देववर्मन, विष्णू वर्धन, सनम सिंग, दिवीज शरण, युकी भांब्री,महेश भूपती, रोहन बोपण्णा, साकेत मायनेनी यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा