भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० असा ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा येथे चाहत्यांमध्ये सचिन तेंडुलकरचा भारतीय मैदानावरील हा अखेरचाच आंतरराष्ट्रीय सामना असल्याची चर्चा अधिक होती.
विजयासाठी फक्त ३२ धावांची आवश्यकता असताना सचिन मैदानावर आल्यानंतर विजयाचा फटका तोच मारणार अशी चाहत्यांची अपेक्षा होती. त्याने नेहमीप्रमाणे आभाळाकडे पाहात मैदानावर प्रवेश केला, तेव्हा बहुतेक सर्व प्रेक्षकांनी उभे राहूनच त्याचे स्वागत केले. मात्र तो खेळपट्टीवर फार काळ टिकाव धरू शकला नाही. केवळ पाच चेंडू खेळून तो तंबूत परतल्यामुळे चाहत्यांची कमालीची निराशा झाली.
सामना संपल्यानंतर सचिनचा हा अखेरचा सामना होता काय, असे विचारले असता धोनी म्हणाला,‘‘ सचिनविषयी प्रसारमाध्यमांनी तर्कवितर्क करीत वृत्त देऊ नये. मी याविषयी सांगितल्यानंतरच वृत्त द्यावे. कारण २००५मध्येही तुम्ही मला हाच प्रश्न केला होता. त्यानंतरही सचिन चमकत आहे.’’
माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले की, ‘‘सचिन हा अतिशय महान खेळाडू आहे. अजून किती खेळायचे याचा निर्णय त्यानेच घ्यायचा आहे. स्थानिक किंवा परदेशी मैदानावर खेळत राहायचे की नाही, याचा निर्णय घेण्याइतका तो समर्थ खेळाडू आहे.
कपिल देव म्हणाले, ‘‘सचिनच्या निवृत्तीविषयी चर्चा करणे थांबविले पाहिजे. कारण त्याने पुढे खेळत राहायचे की नाही, याचा निर्णय तो आणि निवड समिती घेईल. आणखी तीन-चार वर्षेही तो चांगली कामगिरी करीत खेळत राहील असा मला विश्वास आहे. आपण त्याचा आदर करणे उचित ठरेल.’’
शानदार मालिका विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन !!! भारताच्या युवा खेळाडूंचे शानदार प्रदर्शन..
-शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू
भारताने संपूर्ण मालिकेत वर्चस्व गाजवले. अॅशेसपूर्वी ऑस्ट्रेलियाला प्रचंड परिश्रम करावे लागतील. भारतीय संघाचे मन:पूर्वक अभिनंदन !!!
-ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू